बजाज ऑटोची दुचाकींच्या श्रेणीतील सर्वाधिक ग्राहक पसंती लाभलेली ‘पल्सर’च्या श्रेणीतील नवीन ‘पल्सर आरएस २००’ गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दाखल करण्यात आली. स्पोर्ट्स बाइक बाजारपेठेसाठी कंपनीने प्रस्तुत केलेल्या पल्सर २०० एनएसच्या धर्तीवरील या बाइकची मुंबईतील एक्स-शो रूम किंमत मात्र तुलनेने कमी १.१८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. पुण्यानजीकच्या चाकण प्रकल्पातून निर्मिती होणाऱ्या या बाइकची उर्वरित महाराष्ट्रातील निवडक बजाज डीलर्सकडे एक्स-शोरूम किमत १००,२६८ रुपयांपासून सुरू होईल. एनएस २०० प्रमाणेच १९९ सीसी क्षमतेचे इंजिन असलेल्या नवीन पल्सर आरएस २०० ही बजाजच्या पल्सर श्रेणीतील सर्वात वेगवान बाइक असल्याचा दावा कंपनीच्या मोटारसायकल व्यवसाय विभागाचे प्रमुख एरिक वाझ यांनी केला. या बाइकद्वारे १४१ किलोमीटर प्रति तास इतका सर्वोच्च वेग गाठला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.pnv प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एलईडी टेल लॅम्प, ५४ किलोमीटर प्रति लिटर इंधन किफायतशीरता, मोनोशॉक रिअर सस्पेंशन अशी नव्या पल्सरची अन्य वैशिष्टय़े त्यांनी सांगितली. याच श्रेणीतील तिसरी पल्सर २०० एएस (अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स) बाइकही कंपनीकडून लवकरच बाजारात येणे अपेक्षित आहे.