दिवाळीच्या निमित्ताने ‘बजाज फिनसव्‍‌र्ह’तर्फे राबविण्यात आलेल्या ‘स्पार्किंग दिवाली’ या सवलतीतील वित्तीय सहकार्य योजनेला ३०% अधिक प्रतिसाद मिळाला असून या कालावधीत कंपनीने ३०० कोटी रुपयांचे वित्त पुरवठा केला आहे.
८१ शहरातील पाच हजारांहून अधिक ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वित्त सहकार्यामुळे कंपनीकडे दिवाळीच्या  कालावधीत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी कर्ज मागणारे सहा लाख अर्ज आले. यामुळे कंपनीकडून दिले जाणाऱ्या कर्जाची रक्कम आता १,५०० कोटी रुपयांवरून १,९०० कोटी रुपये झाली आहे.
‘बजाज फिनसव्‍‌र्ह लेन्डिन्ग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जैन यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत सर्वाधिक वस्तूंची मागणी ही अर्थातच मुंबईतून होती. तर देशस्तरावर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पश्चिम भारताचा समावेश होता. एलईडीसारख्या उत्पादनांनी कंपनीला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी ५५ टक्के हिस्सा राखला आहे, असे कंपनीच्या ग्राहक वित्त विभागाचे अध्यक्ष देवांग मोदी यांनी सांगितले.
पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘बजाज फिनसव्‍‌र्ह’ या बिगर बँकिंग वित्तसंस्थेचे ५० लाख ग्राहक आहेत. कंपनीमार्फत विद्युत उपकरणे, गृह, वाहन तसचे लघु उद्योगासाठी कर्ज पुरवठा केला जातो.