औद्योगिक क्षेत्रास लागणाऱ्या पाणीपुरवठय़ात दुष्काळामुळे ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेण्यात आला. अनेक कंपन्यांच्या उत्पादनात घट होत असल्याची आकडेवारी उत्पादन शुल्क व अबकारी विभागाकडे सादर केली जात आहे. मात्र, बजाज कंपनीने दररोज पाणी वापरण्याच्या प्रणाली बदलून ५० टक्के पाण्याची आवश्यकता कमी केली व उत्पादनातही २० टक्क्यांनी वाढ केल्याचा दावा बजाजचे उपाध्यक्ष कैलाश झांझरिया यांनी केला.
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर बजाज कंपनीने वेगवेगळय़ा उपाययोजना हाती घेतल्या. पूर्वी त्यांना २२०० ते २३०० घनमीटर पाणी लागत होते. बहुतांश पाण्याचा उपयोग दुचाकींना रंग देण्यासाठी केला जातो. तसेच कंपनीत येणाऱ्या किमान चार हजार व्यक्तींना लागणारे पाणी काटकसरीने कसे वापरता येईल, याचे नियोजन करण्यात आले. प्रामुख्याने तीन टप्प्यांत हे बदल करण्यात आले. दुचाकी बनविताना वेगवेगळय़ा ठिकाणी मोठा हवेचा दाब आवश्यक असतो. विशेषत: काही स्क्रू आवळण्यास हवेचे पंप बसविलेले असतात. ही हवा तयार करण्यासाठी पूर्वी पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असे. वॉटर कूलर कॉम्प्रेसरऐवजी आता एअर कूलर कॉम्प्रेसर वापरले जातात. जे पाणी येते, तेवढय़ा पाण्याचा पुनर्वापर करण्यावरही भर देण्यात येत आहे. त्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रसामग्री बसविण्यात आली. पाणी शुद्धीकरणाची ‘आरओ’ प्रणाली वापरून उर्वरित पाणी फळबागा, झाडे व फुलांना दिले जाते. या प्रणालीसाठी ३ कोटी रुपये खर्च बजाजने केला.
उत्पादनासाठी वापरतो तेवढेच पाणी जमिनीत मुरवता यावे, यासाठी वेगळे प्रयोग हाती घेण्यात आले आहेत. पूर्वी कंपनीतील जलवाहिनी भूमिगत होती. ती आता भूपृष्ठावर दिसेल अशी करण्यात आली. अशी जलवाहिनी टाकल्याने गळती लगेच लक्षात येऊन दुरुस्त करणे सोपे जाते. पाणी वापराच्या अनेक प्रणाली बदलल्याने या वर्षांत २२०० ते २३०० घनमीटर पाण्याऐवजी १३२५ घनमीटर पाणी एवढेच पाणी वापरले जाते. काटकसरीने पाणी वापरण्यासाठी नळांच्या तोटय़ादेखील बदलण्यात आल्या. हात धुण्यासाठी जेवढे पाणी लागते, तेवढेच पाणी नळामधून बाहेर येते आणि नंतर ते आपोआप थांबते. अशा २०० वेगळय़ा प्रकारच्या तोटय़ांसाठी ६ लाख रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे पाण्याचा मोठा गैरवापर टळल्याचे कर्मचारी सांगतात.
पाणीवापरातील काटकसरीचा उत्पादनावर परिणाम होऊ द्यायचा नाही, असे धोरण घेण्यात आले. यंदा फेब्रुवारीअखेपर्यंत उत्पादनात २० टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा कंपनी प्रशासनाने केला. दुचाकी, तीनचाकी उत्पादनाबरोबरच येत्या काही दिवसांत बजाज चारचाकी गाडय़ांचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात सुरू करणार आहे. टंचाईकाळात असे उपक्रम अन्य कंपन्यांमध्येही सुरू व्हावेत, यासाठी चर्चासत्रे घेतली जाणार असून, ग्रामीण भागात काटकसरीने पाणीवापराचे प्रशिक्षण गावकऱ्यांना मिळावे म्हणून एक गाव दत्तक घेण्याचाही मानस उपाध्यक्ष कैलाश झांझरिया यांनी व्यक्त केला. या अनुषंगाने जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्याशीही चर्चा झाली आहे.