बजाज व्ही बाइक बाजारात दाखल झाल्याच्या चार महिन्यांतच तिने एक लाख गाडय़ांच्या विक्रीचा मैलाचा दगड गाठल्याची घोषणा बजाज ऑटो इंडियाने केली आहे. आयएनएस विक्रांत या निवृत्त युद्धनौकेच्या धातूचा वापर करून बजाज व्ही तयार करण्यात आली आहे. तिच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक भारतीय आता भारताच्या नौदलाच्या ऐतिहासिक वारशाचे पाईक झाले आहेत.
बाजारात दाखल झाल्या झाल्या भारतभरातून बजाज व्हीच्या २०,००० गाडय़ांचे बुकिंग झाले.
बजाज व्हीचे वितरण २३ मार्च रोजी सुरू झाले आणि ही गाडी बाजारात दाखल झाल्याच्या पहिल्या दिवशीच १०,००० ग्राहकांनी व्हीवरून सफर केली. एप्रिल महिन्यात भारतात सर्वाधिक विक्री झालेल्या पहिल्या १० मोटरसायकलमध्ये बजाज व्हीची वर्णी लागली. बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष (मोटरसायकल विक्री) एरिक वास यांच्या मते, दरमहा सरासरी २५,००० गाडय़ांची विक्री सध्या होत आहे आणि त्यामुळे प्रीमिअम कम्युटर १२५ सीसी+ दुचाकीच्या गटात बजाज ऑटोचा बाजारहिस्सा १० टक्क्यांनी वाढला आहे.
हा मैलाच दगड गाठल्याबद्दल प्रतिक्रिया देताना बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष (मोटरसायकल सेल्स) श्री. एरिक वास म्हणाले, ‘एक ऐतिहासिक अंश प्रत्येक भारतीयाकडे असावा या उद्देशाने द इन्व्हिन्सिबल व्ही बाजारात दाखल करण्यात आली. भारतीय ग्राहकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही आनंदित झालो असून सप्टेंबपर्यंत आम्ही या गाडीचे उत्पादन वाढविणार आहोत. आम्हाला खात्री आहे की विक्रीच्या आकडय़ामध्ये सातत्याने वाढच होत जाईल आणि भारतातील सर्वाधिक विक्री होणारी एक प्रीमिअम कम्युटर मोटरसायकल म्हणून बजाज व्हीचे स्थान कायम राहील. वाढती मागणी पाहता उत्पादन क्षमतेत वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.