बॅलन्स्ड फंड नेमके काय?

म्युच्युअल फंडांचे बॅलन्स्ड फंड अलीकडे गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरत आहेत. मागील दोन वर्षांत समभाग केंद्रित बॅलन्स्ड फंडातील एसआयपी गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या वाढीतूनही हे स्पष्ट होते. मागील तीन महिन्यांत आयडीएफसी, महिंद्रा आणि आता बीएनपी पारिबा फंड घराण्यांचे बॅलन्स्ड फंड प्रारंभिक विक्रीसाठी बाजारात आले आहेत, तर २०१६-१७ सालात आठ बॅलन्स्ड फंडांनी प्रारंभिक विक्रीतून लक्षणीय गुंतवणुकीला आकर्षित केले. बॅलन्स्ड फंडांकडे पाहण्याचा गुंतवणूक दृष्टिकोनाविषयी थोडे विस्ताराने..

एक मनुष्यप्राणी या नात्याने जीवनात परिपूर्ण संतुलन साधण्याचा आपला आटोकाट प्रयत्न सुरू असतो. कामाच्या ठिकाणी संतुलित वातावरण हवे, तर नातेसंबंधातही संतुलन जपण्याचा आपला प्रयत्न असतो. तर मग आपला कष्टाचा पैसा जेथे गुंततो तेथे असे संतुलन का असू नये? संतुलन ही मुळातच सुस्थिरता आणि सक्षमता प्राप्त करण्यासाठी तराफ्याच्या दोन्ही बाजूला सारखे वजन वा बळ विभागले जाईल अशी संकल्पना आहे. गुंतवणुकीतील संतुलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही असाच आहे. गुंतवणूक परिभाषेत, बॅलन्स अर्थात संतुलन ही संज्ञा बाजाराच्या उलथापालथ व वादळवाऱ्यात तग धरून राहणाऱ्या वैविध्यपूर्ण गुंतवणूक भांडाराला आकार देण्याशी संलग्न आहे. म्युच्युअल फंडाचा कोणताही बॅलन्स्ड फंड नेमके हेच उद्दिष्ट साकारत असतो. म्हणजेच बॅलन्स्ड फंड गुंतवणूकदारांच्या गुंतलेल्या पैशांत वृद्धी राखण्याचे उद्दिष्ट हे त्या गुंतवणुकीला किमानतम जोखीम राहील हे पाहून साकारत असतात.

तर मग स्वाभाविक प्रश्न- बॅलन्स्ड फंड नेमके काय? तराफ्याच्या दोन बाजूंना समान बल वितरण या न्यायाने बॅलन्स्ड फंडातून अधिक परताव्याची समभागसंलग्न (इक्विटी) आणि थोडे कमी परंतु स्थिर व जोखीमरहित उत्पन्नासाठी रोखे (डेट) अशी दोन्हींमध्ये गुंतवणूक विभागलेली असते. सामान्यत: ६० ते ७० टक्के गुंतवणूक समभाग व समभाग केंद्रित, तर उर्वरित ३० ते ४० टक्के गुंतवणूक ही रोख्यांमध्ये असते. जेणेकरून बाजार तेजीत असताना चांगला लाभ कमावण्याची संधी गुंतवणूकदारांना असते, त्या उलट पडतीच्या आणि अस्थिर बाजारात गुंतलेल्या पैशाला किमान दगाफटका राहील अशीही खातरजमा केली जाते. दोन्ही पर्यायांमध्ये त्या त्या समयी योग्य प्रमाणात पैसा विभागला जाईल अशी बॅलन्स्ड फंडाची अंगभूत रचना असते, ज्यातून जोखमीचे प्रमाणही कमी केले जाते. जेव्हा शेअर बाजाराचा चढता क्रम सुरू असेल तेव्हा समभागसंलग्न पर्यायांमध्ये कमालतम गुंतवणूक ठेवून या फंडांना अधिकाधिक परतावा मिळविता येतो, त्या उलट बाजाराच्या अवघड स्थितीत रोख्यांमधील गुंतवणूक वाढविली जाऊन उत्पन्नाला आवश्यक तो आधार पोहोचविला जातो.

इक्विटी आणि डेट गुंतवणुकीच्या मात्रेत फेरबदल हे बाजाराच्या स्थितीवर आणि त्या स्थितीला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादावर अवलंबून असते. बाजार तेजीत समभागांमधील गुंतवणूक स्वाभाविकपणे वाढते, परंतु निधी व्यवस्थापकाला त्यातील नफा गाठीशीही बांधता आला पाहिजे. मग योग्यसमयी विशिष्ट समभागांची आंशिक किंवा पूर्ण विक्री केली जाते आणि नवीन समभाग खरेदी करून एकूण समभाग गुंतवणुकीची मात्रा आणि तराफ्याचे संतुलन राखण्याचे काम निधी व्यवस्थापक करतात. बरोबरीने बाजार घसरणीला असताना, समभागांतील गुंतवणुकीचे प्रमाण रोडावते. त्या स्थितीतही तराफ्याचे वजन संतुलन सांभाळण्यासाठी निधी व्यवस्थापकाला रोख्यातील गुंतवणूक वाढविण्यासह, खालच्या भावात उपलब्ध चांगल्या समभागांची खरेदीही निरंतर सुरूच ठेवावी लागते. सारांशात, ‘बाय लो अ‍ॅण्ड सेल हाय’ हे शहाणेसुरते सांगून गेलेला बाजार नियमच या ठिकाणी अधिक सुसंगत पद्धतीने अनुसरला जातो.

बॅलन्स्ड फंडांची कर कार्यक्षमता हा गुंतवणूकदारांसाठी एक अतिरिक्त फायदा आहे. बहुतांश बॅलन्स्ड फंड हे समभागांमध्ये अधिकांश म्हणजे ६५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करीत असल्याने, या फंडांना इक्विटी फंड या वर्गवारीतच गणले जाते आणि पर्यायाने त्या फंडांना असलेले सर्व कर लाभही त्यांना मिळतात. याचा अर्थ या फंडातील गुंतवणूक १ वर्ष कालावधीपेक्षा अधिक असेल तर अशा गुंतवणूकदारांना फंडाच्या विक्रीतून झालेला भांडवली लाभ पूर्णपणे करमुक्त असतो.

आजच्या गतिमान माहिती युगात, विविध कोनांतून नवनव्या माहिती-घटना-वार्ता भांडवली बाजाराला सारख्या धडका देत असतात. त्यामुळे एका क्षणात बाजाराचे चित्र अस्थिर बनते आणि चंचलता हा तर बाजाराचा स्थायीभावच आहे. बॅलन्स्ड फंडातील गुंतवणूकदारांना मात्र याची चिंता करण्याचे कारण नसते. जोखीम टाळून चांगला परतावा मिळविण्याची आस असणाऱ्यांना आणि दीर्घ कालावधीत अपेक्षित संपत्ती निर्माणाच्या संधीच्या शोधात असणाऱ्यांना म्हणूनच बॅलन्स्ड फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली जाते.

(लेखक बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाचे वरिष्ठ समभाग निधी व्यवस्थापक आहेत.)

[jwplayer gLyhqAeU-1o30kmL6]