सरकारचा पुढाकार बँक समभागांच्या पथ्यावर

वाढत्या बुडीत कर्जाचा सामना करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समस्येवर येत्या काही दिवसांत अंतिम तोडगा निघण्याच्या सरकारच्या संकेताने भांडवली बाजारातील सूचिबद्ध बँक समभागांना गुंतवणूकदारांकडून सप्ताहअखेरच्या व्यवहारात मोठी मागणी आली. बँकांचे समभाग मूल्य शुक्रवारी ६.५ टक्क्यांपर्यंत झेपावले. यामध्ये सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकांचा समावेश राहिला. तर मुंबई शेअर बाजारातील बँक निर्देशांक १.२३ टक्क्याने वाढला.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली Arun Jaitley यांनी बँकांच्या बुडीत कर्जाबाबत येत्या काही दिवसांमध्ये मार्ग काढला जाईल, असे म्हटले आहे. याबाबतचा प्रस्ताव रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहकार्याने तयार केला जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. डिसेंबर २०१६ अखेर बुडीत कर्जाची रक्कम ६.०६ लाख कोटी रुपये नोंदली गेली आहे.

भांडवली बाजाराला स्फुरण

बँक समभागांना मागणीचे चित्र  भांडवली बाजारात तेजी नोंदविणारे ठरले. यापूर्वीच्या सलग तीन सत्रातील घसरणीनंतर सेन्सेक्ससह निफ्टीने गुरुवारीत वाढ नोंदविली होती. तर शुक्रवारी मुंबई निर्देशांकात जवळपास ९० अंश भर पडली. या तेजीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही ९,१०० चा सूर गवसला. बाजारातील व्यवहारा दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँक समभागांच्या तेजीत खासगी बँकांनीही भाग घेतला.

बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण येत्या काही कालावधीत किमान स्तरावर येईल. म्हणूनच गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांचे निधी व्यवस्थापकांचाही बँकांशी निगडित समभागांना पसंती कल वाढलेला स्पष्टपणे दिसत आहे.  नीलेश शेट्टी, सहयोगी निधी व्यवस्थापक (समभाग), क्वांटम म्युच्युअल फंड.

untitled-13