एक दिवसाची सार्वजनिक सुटी आणि दोन दिवसाच्या औद्योगिक बंदमुळे देशभरातील बँका मंगळवारपासून (दि. १९) सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. बँकांच्या सेवा व व्यवहार विस्कळीत होण्याची हा महिन्याभरातील दुसरा प्रसंग असून त्याचा फटका आर्थिक राजधानीतील कोटय़वधींच्या व्यवहारांना बसणार आहे.
सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारपासूनच्या (दि. २० व २१) दोन दिवसांच्या बंदची हाक विविध ११ कामगार संघटनांनी दिली आहे. यामध्ये बँकांशी निगडित पाच आघाडीच्या संघटनाही उतरल्या आहेत. मात्र तत्पूर्वी मंगळवारी, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सुट्टीनिमित्त फक्त बँकांचे व्यवहार बंद राहतील, तथापि चलन बाजार, शेअर बाजार व सराफ बाजारात व्यवहार नियमितपणे सुरू राहणार असले तरी बँका बंद असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम या बाजारांतील उलाढालींवर दिसून येईल.
या सुट्टीला लागूनच सलग दोन दिवसांचा देशव्यापी बंद यामुळे राज्यात बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याची भीती दर्शवून ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने सोमवारी बँकांना कामकाजाचे तास वाढविण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून अनेक राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होत्या. यापूर्वी जानेवारी महिन्यातही ईद-ए-मिलाद (दि.२५), प्रजासत्ताक दिन (दि.२६) व जोडून रविवारही (दि.२७) आल्याने राष्ट्रीयीकृत, खाजगी तसेच सहकारी बँकांचे सलग तीन व्यवहार ठप्प होते.