बँक कर्मचारी संघटनेचा निर्वाणीचा इशारा; अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या तक्रारी

चलनकल्लोळातून सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा रोष बँक कर्मचारी महिनाभर झेलत आहेत. परंतु दर दिवशी परिस्थिती बिघडत चालली असून, शाब्दिक दूषणांसह बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर हल्ल्यांपर्यंत गेलेली मजल पाहता, सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेने पुरेशी रोकड उपलब्ध केल्यासच शाखांचे कामकाज चालविले जाईल, अशा भूमिकेपर्यंत बँक कर्मचाऱ्यांची संघटना पोहोचली आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण उस्मानाबाद, सोलापूरमधील शाखांमध्ये तसेच विदर्भातील अकोला जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांमध्ये ग्राहक, खातेदारांकडून संघटित हल्ल्याच्या आणि शाखांना घेराव घालून बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवण्याच्या घटना गेल्या काही दिवसांत पुढे आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघ (एआयबीईए) ने केंद्रीय अर्थमंत्री, रिझव्‍‌र्ह बँक आणि भारतीय बँक महासंघ (आयबीए) ला निवेदन देऊन निर्वाणीचा इशारा दिला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असून, येत्या १० डिसेंबपर्यंत नोटांच्या उपलब्धतेची स्थिती सुधारली नाही, तर कर्मचाऱ्यांनाही संघटितपणे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा ‘एआयबीईए’चे महाराष्ट्राचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून दिला.

[jwplayer TVtN2RpS]

महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लोकांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा झाली असून, बँकांकडे उपलब्ध रोकड आणि खातेदारांची मागणी यांत तफावत दिसून येत आहे. मुंबई-पुण्यातील अनेक बँकांच्या शाखांमध्ये पहिल्या दोन-तीन तासांतच खातेदारांच्या पैशांची मागणी भागवून रोकड संपते अशी स्थिती आहे. तर ग्रामीण भागात रोकड मिळाली तरच बँकांच्या शाखांचे तीन-चार दिवसांत एकदा शटर उघडले जाते अशी स्थिती असल्याचे तुळजापूरकर म्हणाले. सेवानिवृत्ती वेतन मिळविणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची या स्थितीत आणखी गैरसोय होऊ  नये म्हणून १० तारखेपर्यंत वाट पाहण्याचे संघटनेने धोरण ठरविले आहे. त्यापुढेही नोटांच्या चणचणीच्या स्थितीत सुधाराची शक्यता कमीच असल्याचे मत त्यांनी खंतपूर्वक व्यक्त केले. रिझव्‍‌र्ह बँक एकीकडे बँकांना पुरेशी रोकड उपलब्ध करून दिली जात असल्याचे आणि परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात किती प्रमाणात नव्या चलनी नोटा बँकांना उपलब्ध करून दिल्या आणि परिस्थिती हाताळण्याची त्यांची पद्धती काय, याबद्दल रिझव्‍‌र्ह बँक काही सांगत नाही. यातून बँकांच्या शाखांकडे पैसा आहे, पण तो दिला जात नसल्याचा गैरसमज निर्माण होतो आणि खिडकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर संतापाला सामोरे जावे लागते. तुळजापूरकर यांनी असाही दावा केला की, ५०० रु. मूल्याच्या नव्या नोटा मुंबई-पुण्यातच उपलब्ध करून दिल्या असून, त्याही अनेक बँकांमध्ये केवळ एटीएममध्ये भरण्यासाठीच वापरात येत आहेत.

बँकांमध्ये अघोषित काम बंदच!

बँक कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी १० डिसेंबरच्या संपाची तयारी करत आहेत. याबाबत ‘एआयबीईए’ बँक संघटनेचे तुळजापूरकर म्हणाले, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांनी संप करायची गरजच नाहीच, बँकांमध्ये सध्या अघोषित काम बंद सुरूच आहे. त्यामुळे संपाचे हत्यार उपसले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तथापि अनेक शाखाधिकाऱ्यांना दिवसा उपलब्ध पाच-सात लाख रुपयांच्या तुटपुंज्या रोकडीतून दिवसाचे पाच तास शाखांचे कामकाज कसे चालवावे असा प्रश्न असतो. प्रत्येक खातेदाराला मागेल तितकी रोख देणे सुरू केले, तर पहिला तासभरही शाखांना मिळणारी रोकड पुरणार नाही अशी स्थिती आहे. सध्याच्या अंदाधुंदीचा आम्ही काळ्या फिती लावून निषेध, लोकांमध्ये जनजागरणासाठी सभा, पत्रकांचे वाटप वगैरे करत पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

[jwplayer tsnmOiJl]