मोबाइल अॅपद्वारे वित्तीय सवयीच नव्हे तर सांस्कृतिक बदलाचीही रूजवात!

वित्तीय क्षेत्रातील नवोद्योगी उपक्रम ‘पे सेन्स’ने व्यक्तिगत कर्जप्राप्तीची प्रक्रियेला नवा पैलू प्रदान करीत ती अधिक सोपी आणि सहजसाध्य बनविली आहे. विशेषत: कोणतेही क्रेडिट कार्ड, कर्जविषयक पूर्वेतिहास नसणाऱ्या नवव्यावसायिक अथवा नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांसाठी अल्पतम कागदपत्रांसह पाच हजारांपासून ते एक लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज तातडीने उपलब्ध करून देणारा हा पर्याय लोकप्रियही ठरत आहे.

‘पे सेन्स’ हा या धर्तीच्या भारतीय जीवनांतील वित्तीय सवयी व वर्तनात बदलाची कास घेऊन पुढे आलेल्या सुमारे अर्धा डझन नवोद्योगी प्रयत्नांपैकी एक आहे. त्यामुळे मोबाईल अॅप्स हे पिढीतील अंतर नव्हे तर सांस्कृतिक बदलाचीही रूजवात ठरत आहेत.

नुकतीच व्यावसायिक जीवनाला सुरुवात झाली आहे; पहिल्या नोकरीतून सुरू झालेल्या वेतनलाभासह अनेक स्वप्ने आकार घेत आहेत. तरुणाईचा देश असलेल्या भारतात ही गोष्ट नावीन्याची नाही. मात्र या नवतरुणाईच्या स्वप्न-आकांक्षांच्या पंखांचा पसारा अथांग आहे. कुणाला चालू नोकरीसह आपली निपुणता आणखी वाढविण्यासाठी नवे शिकत जाण्याची आस आहे, तर कुणाला व्यावसायिक भरारीसाठी नव्या सामग्री व खेळत्या भांडवलाची गरज आहे. अशांसाठी ‘पे सेन्स ईएमआय’ हा आपला अत्यंत सोपा व्यक्तिगच कर्जाचा प्रकार खूपच उपयुक्त ठरला आहे, असे पेसेन्सच्या सह-संस्थापिका आणि मुख्य परिचालन अधिकारी सायली करंजकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. सरासरी ४५,००० रुपये या दराने पेसेन्सने अल्पावधीत लाखभर ग्राहकांचा विश्वास कमावत ३० कोटी रुपयांचे कर्जवितरणही केले असल्याचे त्या म्हणाल्या.

बँकांच्या तुलनेत व्यक्तिगत कर्जासाठी (पर्सनल लोन) व्याजाचे दर तुलनेने अधिक असले तरी ते क्रेडिट कार्डापेक्षा स्वस्त आणि अत्यंत सोपी प्रक्रिया व तात्काळ उपलब्धता यामुळे पे-सेन्स ईएमआयला पाठबळ वाढत आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यात साधारण १० पटीने प्रगती करून एकूण कर्ज व्यवसाय ३०० कोटींचा टप्पा गाठेल, असा विश्वास सायली करंजकर यांनी व्यक्त केला.

कोणताही पत-इतिहास, त्या आधारे कर्जदाराला दिला जाणारा पत-गुणांक न पाहता, तंत्रज्ञानाधारित प्रणालीतून कर्जइच्छुक ग्राहकांची समाजमाध्यमातील सक्रियता, त्याच्या फोनमधील संपर्क सूची वगैरे पडताळून पेसेन्सद्वारे विनाविलंब कर्जमंजुरी दिली जाते. ‘ई-केवायसी’च्या दृष्टीने आवश्यक आधार क्रमांक, पॅन क्रमांक, बँक खाते क्रमांक मिळवून कर्ज वितरण थेट बँक खात्यात काही तासांच्या आत करणारी ही सुविधा तरुणांना खूप भावणारी आहे. त्यामुळे आपले २५ ते ३५ वयोगटात सर्वाधिक ग्राहक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या मुंबई, पुणे, दिल्ली, एनसीआर, बंगळुरू, चेन्नई या सात शहरांमध्ये कार्यरत असलेले पेसेन्स सेवेची पुढील काही महिन्यांत देशव्यापी विस्ताराची योजना आहे. कंपनीने अलीकडे खासगी साहसी गुंतवणूकदारांकडून ५३ लाख अमेरिकी डॉलरचे आर्थिक पाठबळ मिळविले आहे. काही महिन्यांपूर्वी याच गुंतवणूकदार समूहाने कंपनीत २३ लाख डॉलर गुंतविले आहेत. नव्याने होत असलेल्या गुंतवणुकीचा विनियोग आपल्या डिजिटल पत व्यासपीठाच्या तंत्रज्ञान-समर्थतेसाठी आणि त्यायोगे व्यावसायिक विस्तारासाठी करण्याचा मानस सायली करंजकर यांनी स्पष्ट केला.