भारतीय अर्थव्यवस्थेला वेग देणाऱ्या अनेक घडामोडी येत्या काही आठवडय़ावर येऊन ठेपल्या असल्याचे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने आपल्या अहवालात म्हटले आहे. यासाठी दिलेल्या कारणांमध्ये बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
वित्तसंस्थेने म्हटले आहे की, अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या निर्णयानंतर भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेला तिच्या २९ सप्टेंबरच्या पतधोरणात व्याजदर कपातीबाबत निर्णय घेणे सुलभ होईल. बिहार विधानसभेचे निकाल आणि कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष याबाबतचा कल भांडवली बाजार नोंदवील.
अमेरिकन अर्थव्यवस्था रुळावर आल्याचे द्योतक फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढीमार्फत स्पष्ट झाले तर ते भारतासाठी सकारात्मकच ठरेल, असे नमूद करून वित्तसंस्थेने अमेरिकेमुळे निर्यातीला मागणी येऊन रुपयाही अधिक भक्कम होईल, असा विश्वासही याबाबतच्या अहवालात अर्थतज्ज्ञ अभिषेक गुप्ता व इंद्रनील सेन गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.
व्याजदर वाढीचा निर्णय अमेरिकेने लांबणीवर टाकला तर भारताची मध्यवर्ती बँकही तिचे दराबाबतचे निर्णय डिसेंबपर्यंत पुढे ढकलेल, असे स्पष्ट करत रिझव्‍‌र्ह बँक महागाई, विकास दर हेही दरम्यानच्या कालावधीसाठी नजरेच्या टप्प्यात ठेवील, असे वित्तसंस्थेने म्हटले आहे.