रिझव्‍‌र्ह बँकेच्या देखरेखीखाली आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने व्यवसाय पुनरुत्थानाचा निर्धार व्यक्त केला आहे.

‘बँक ऑफ महाराष्ट्र’ची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पुणे येथील मुख्यालयात झाली. या बैठकीमध्ये मार्च २०१७ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांचे लेखापरिक्षित अहवाल बँकेच्या भागधारकांपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले. तसेच एकूण २,००० कोटी रुपयांचे भागभांडवल उभारण्यासाठी भागधारकांची अनुमतीही घेण्यात आली.

बँकेच्या कामगिरीचा आढावा घेताना बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे म्हणाले की, चांगल्या पावसाचा अंदाज आणि कर्जपुरवठा  मागणीमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेऊन बँकेने गृह, वाहन व इतर फुटकर कर्जे, लघू उद्योग कर्जे आणि कृषी कर्जाना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. अनुत्पादक कर्जाच्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करणे, संभाव्य अनुत्पादक कर्जावर नियंत्रण ठेवणे, नवीन पतविस्तार आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढवणे  ही बँकेची धोरणे आहेत. बँकेची परिस्थिती बदलण्यासाठी बँक प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून चालू आर्थिक वर्षांत बँक पुन्हा नफा मिळवेल, असा विश्वास त्यांनी भागधारकांपुढे व्यक्त केला.

आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या कामगिरीबाबत मराठे म्हणाले की, बेसल ३च्या १०.२५% या आवश्यक मापदंडापेक्षा बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण खूपच अधिक म्हणजे ११.०८% असून सामान्य भांडवल स्तर १ हा ६.७५% या किमान आवश्यकतेच्या तुलनेत ७.२८% आहे. २०१६—१७ साठी बँकेचा कार्यान्वयन नफा १,८२७ कोटी रुपयांचा आहे. या दरम्यान चालू व बचत खात्यातील ठेवींचे प्रमाण ३६.६७% वरून ४४.८९% वर गेले आहे.

मराठे यांच्या नेतृत्वाखाली २०१७-१९ या आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासूनच बँकेच्या पुनरुत्थानासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांची भागधारकानी प्रशंसा केली.