स्टेट बँकेतील पाच सहयोगी बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातील बँक कर्मचारी शुक्रवार, २९ जुलै रोजी एक दिवसांच्या संपावर जात आहेत.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन’ (यूएफबीयू)च्या नेतृत्वाखाली विविध नऊ बँक कर्मचारी, अधिकारी संघटना या संपात सहभागी होत आहेत. संपकरी सघटनांच्या अंतर्गत एकूण आठ लाख बँक कर्मचारी येतात.

स्टेट बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील सर्व २७ बँकांमधील कर्मचारी शुक्रवारच्या संपात सहभागी होत असल्याने बँकिंग व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेने तर यामुळे शाखांमध्ये गैरसोय होऊ शकते, असे बँक खातेदार/ग्राहकांना कळविले आहे.

‘यूएफबीयू’शी संलग्न असलेल्या ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफिसर्स फेडरेशन’ व ‘ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशन’ या स्टेट बँक कर्मचाऱ्यांची संघटनाही संपात उतरत आहे. मुख्य कामगार आयुक्तांबरोबर मंगळवारी झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागल्याचे ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’(एआयबीईए)ने म्हटले आहे.

बँक संघटनेने यापूर्वी १२ व १३ जुलैच्या संपाची हाक दिली होती. मात्र हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात गेल्यामुळे तो रद्द करण्यात आला. बँक क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणूक, क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे तसेच सहकारी बँकांचे खासगीकरण यालाही बँक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

पाच सहयोगी बँका तसेच भारतीय महिला बँकेला विलीन करून घेण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला आहे. याबाबत बँक संचालक मंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी देताना नोकरकपात होणार नसल्याची हमी दिली आहे. मार्च २०१७ पर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.