माहिती तंत्रज्ञान व्यासपीठाचा उपयोग यंदा देशातील बँक तसेच सुरक्षा क्षेत्र अधिक करण्याची शक्यता असून यंदा ही रक्कम १५ टक्के अधिक ५३,६०० कोटी रुपयांपर्यंत खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जागतिक तंत्रज्ञान सल्लागार कंपनी गार्टनरने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. बँक क्षेत्रात नवे परवाने मिळण्याच्या आशेवर तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक भर दिला जाण्याच्या शक्यतेने यंदाचा कंपन्यांचा त्यावरील खर्चही वाढणार आहे.
२०१४ मध्ये या दोन्ही क्षेत्रात ४६,६०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर यंदा ही रक्कम ५३,६०० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर, अन्य माहिती तंत्रज्ञान तसेच दळणवळण क्षेत्रात हा वाढीव खर्च होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पैकी बँक क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञानावर यंदा १८,३०० कोटी रुपये खर्च होणार असल्याचे गार्टनरचे संशोधन संचालक विट्टोरियो डिऑरझिओ यांनी म्हटले आहे.
भारतात २०१६ अखेपर्यंत सहा नव्या बँका सुरू होणार असल्याचे नमूद करून २०२० पर्यंत ही संख्या ५० पर्यंत जाईल, असेही याबाबतच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. बँक क्षेत्रात नवे स्पर्धक सहभागी होण्याबरोबरच इतरांकडूनही माहिती तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०१५ पर्यंत बंधन आणि आयडीएफसी या दोन वित्तसंस्थांच्या नव्या बँका सुरू होत आहेत. तर पेमेन्ट तसेच छोटय़ा वित्त बँका म्हणून ७५ हून अधिक उद्योग, कंपन्यांनी रिझव्‍‌र्ह बँकेकडे उत्सुकता दर्शविली आहे.

पायाभूत सेवा क्षेत्रातूनही आयटीवर वाढता खर्च
भारतातील पायाभूत सेवा क्षेत्राशी संबंधित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रही यंदा ३.३ टक्क्य़ांनी वाढून २.०२ अब्ज डॉलर होण्याचा अंदाज गार्टनरने व्यक्त केला आहे. सरकार पायाभूत सेवा क्षेत्रावर देत असलेला भर लक्षात घेता या क्षेत्राशी संबंधित माहिती तंत्रज्ञानावर कंपन्या, उद्योगांकडून २०१५ मध्ये अधिक खर्च होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. २०१८ पर्यंत हे क्षेत्र २.२९ अब्ज डॉलरचे होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.