ग्रामीण भागातील व्यवहारांची व्याप्ती आणि तेथे असलेल्या कमी मूल्याच्या नोटांची वाढती गरज लक्षात घेत बँका ग्रामीण भागासाठी विशेष एटीएम सुविधा सुरू करण्याच्या विचारात आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी यांनी दिली. या एटीएममध्ये कमी मूल्याच्या चलनी नोटा उपलब्ध करून देण्यासाठी बँका प्रयत्नशील आहेत.

शहरी भागात एटीएमचे जाळे प्रचंड मोठे आहे. मात्र या एटीएममध्ये शहरी भागातील गरजांनुसार ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अधिक प्रमाणात उपलब्ध असतात. मात्र याउलट ग्रामीण भागातील लोकांना दैनंदिन व्यवहारांसाठी इतक्या उच्च मूल्याच्या नोटांची गरज नसते. येथे ५०, १०० रुपयांच्या नोटांची अधिक गरज असते. ही गरज लक्षात घेऊनच योग्य ते तंत्रज्ञान बँकांनी विकसित करणे गरजेचे आहे. आणि त्याला अनुसरुनच ग्रामीण भागात विशेष एटीएम केंद्रे सुरू करण्याची गरज आहे, असे गांधी यांनी सांगितले. त्याचदृष्टीने बँका तंत्रज्ञान विकसित करूत असल्याची माहितीही  रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरनी दिली. आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील अल्प बचतीची व अल्प वित्तपुरवठय़ाची स्थिती लवकरच पूर्वपदावर येईल, असा आशावादही गांधी यांनी व्यक्त केला. फिक्कीने आयोजित केलेल्या फायनान्शियल सेक्टर कॉन्क्लेव्ह – २०१४ मध्ये ते बोलत होते.

‘त्या’ पैशांच्या असाही विनियोग
देशभरातील बँकांमध्ये बेवारस स्थितीत पडून राहिलेल्या व कोणाकडूनही मालकीचा दावा करण्यात न येणाऱ्या पैशाचा विनीयोग बँकेविषयी ग्राहकांमध्ये जागृती करण्यासाठी तसेच बँकांच्या विविध सुविधांचा वापर कसा करायचा याविषयी ग्राहकांना प्रशिक्षित करण्यासाठी करण्यात यावा, असे पाऊल उचलण्याच्या बेतात रिझर्व्ह बँके सध्या आहे.