एटीएमच्या सुरक्षिततेसाठी बँकांच्या अंगावर कोटय़वधी रुपयांच्या खर्च ओढविण्याची शक्यता वर्तविणाऱ्या बँक व्यवस्थापन संघटनेने आता अन्य बँकांचे एटीएम मोफत वापरण्यावर निदान शहरात तरी सशुल्क करावे, अशी मागणी रिझव्‍‌र्ह बँकेकडे केली आहे. कार्ड असलेल्या बँकेव्यतिरिक्त अन्य बँकांच्या एटीएमवर महिन्यातील पाच मोफत व्यवहार केवळ ग्रामीण भागात कायम ठेवावे, अशी सूचनाही संघटनेने मध्यवर्ती बँकेकडे केली आहे.
बंगळुरुमधील एका एटीएममध्ये महिला बँक कर्मचाऱ्यांवरच हल्ला झाल्यानंतर बँकांना त्यांचे सर्व एटीएम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करावयाचे झाल्यास देशातील बँक क्षेत्रावर कोटय़वधीचा आर्थिक भार पडेल, असे मत ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने व्यक्त केले होते. देशातील बँक व्यवस्थापनाची संघटना असलेल्या या यंत्रणेने आता रिझव्‍‌र्ह बँकेला पत्र लिहून निदान शहरातील एटीएमवर अन्य एटीएम व्यवहार सशुल्क करावे, अशी मागणी केली आहे.
अन्य एटीएममधून पैसे काढण्याबाबतचे महिन्यातील पाच मोफत व्यवहार हे केवळ ग्रामीण भागात कायम ठेवून शहरी भागात, विशेषत: महानगरांमध्ये तरी सशुल्क करावे, अशी शिफारस आम्ही रिझव्‍‌र्ह बँकेकडे केल्याचे संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. टांकसाळे यांनी सांगितले. एटीएमच्या सुरक्षिततेसाठीचा खर्च यामाध्यमातून काही प्रमाणात निघू शकतो; सुरक्षिततेच्या बाबत आम्ही विविध राज्य शासनांबरोबरही चर्चा करत असल्याचे टांकसाळे यांनी सांगितले.
संघटनेच्या दाव्यानुसार, देशभरातील १.४० लाख एटीएमसाठीच्या अतिरिक्त सुरक्षिततेसाठी बँका महिन्याला ४०० कोटी रुपये खर्च करतात. महानगरांमध्ये बँक अंतर्गत सुरुवातीचेही व्यवहार शुल्क लागू केल्याने हा खर्च काही प्रमाणात भरून निघू शकेल, अशीही संघटनेला आशा आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागात सध्या संबंधित बँकेचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हे अन्य बँकांच्या एटीएमवर उपयोगात आणल्यास महिन्यातील पाच व्यवहार मोफत आहेत. असे असले तरी संबंधित बँकेला मात्र अन्य बँकेच्या वापरासाठी प्रति व्यवहार १५ रुपये द्यावे लागतात.