पत गुणवत्तेतही सुधारणेचे संकेत : फिच रेटिंग्जचा अहवाल
भारताच्या बँकिंग व्यवस्थेची डोकेदुखी बनलेल्या अनुत्पादित कर्ज मालमत्तेचा (एनपीए) ताण चालू आर्थिक वर्षांत काहीसा सैलावत असून, बँकांच्या पत गुणवत्तेत सुधारही स्पष्टपणे दिसत असल्याचे ‘फिच रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.
आर्थिक २०१४-१५ मधील बँकांचे थकलेले कर्ज हे एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ११.१ टक्के होते, ते चालू आर्थिक वर्षांत १०.९ टक्क्यांवर ओसरले असल्याचे फिच रेटिंग्जचा बँकांच्या पत गुणवत्तेविषयक अहवालाने नोंदविले आहे. नव्याने कर्ज थकण्याचे प्रमाण मंदावले असून, या दिलाशाचा फायदा बँकांनी काही महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रातील कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी करावा, असे अहवालाने सुचविले आहे. काही शुभसंकेत जरूर दिसत असले तरी पत गुणवत्तेच्या समस्येचा आणखी काही काळ बँकांना वेढा पडलेला असेल, असेही तिने म्हटले आहे.
पायाभूत विकास क्षेत्र आणि पोलाद उद्योगांना एकूण बँकिंग व्यवस्थेतून २० टक्के कर्ज वितरण असून, एकूण कर्ज थकीतात याच क्षेत्राचे ४० टक्के योगदान आहे. मात्र या क्षेत्रातील कर्जसाहाय्याविना खोळंबलेल्या प्रकल्पांची वाट मोकळी झाल्यास ते एकूण उद्योग क्षेत्राच्या उभारीच्या दृष्टीने परिणामकारक ठरेल. तथापि बँकांसाठी भांडवलाची निर्मिती झाल्यास त्यांना व्याजदरातील ताजी कपात अधिक प्रभावीपणे कर्जदारांपर्यंत पोहोचविता येईल, असेही फिचने सरकारला सूचित केले आहे.

कॉर्पोरेशन बँकेचे ५३२ कोटींचे कर्ज बुडितात!
सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेशन बँकेने ‘सीबीआय’ चौकशीचा ससेमिरा मागे लागलेल्या आरईआय अ‍ॅग्रो कंपनीला दिलेले ५३२ कोटी रुपयांचे ‘बुडीत खाती’ (राइट-ऑफ) नोंद केले आहे. चालू तिमाहीसाठी या बुडीत कर्जाखातर संपूर्ण तरतूद बँकेने केली आहे. युको बँकेच्या नेतृत्वात विविध बँकांच्या समुच्चयाने आरईआय अ‍ॅग्रोला २०१३ सालापासून ३,८१५ कोटींचे कर्ज दिले आहे. कंपनीने कर्ज रक्कम दुसऱ्या कारणासाठी वळवून गैरव्यवहार केल्याची तक्रार युको बँकेने केली असून, सीबीआयने त्याची दखल घेत तपास सुरू केला आहे.