पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातून विविध पंचवीस क्षेत्रांतील उद्योगांची व्यावसायिक कार्यक्षमता वाढविणे व उत्पादकतेच्या पातळीवर जगाशी स्पर्धा करू शकतील अशा अवस्थेत त्यांना नेणे असा असल्याने, अशा प्रथितयश लघू व मध्यम उद्योगक्षेत्रातील (एसएमई) कंपन्या म्हणजे बँका आणि वित्तसंस्थांसाठी सध्याच्या थकीत कर्जाच्या समस्येने गढूळलेल्या औद्योगिक वातावरणात ‘फायद्या’चे ग्राहकच ठरणार आहेत.  
उत्पादकता वाढविणे हा ‘मेक इन इंडिया’ योजनेचा प्रमुख उद्देश आहे आणि प्रस्थापित कंपन्यांपेक्षा नव्या दमाचे लघू व मध्यम उद्योगच (एसएमई) या धोरणाचे मुख्य लाभार्थी ठरून, कमालीच्या वेगाने प्रगती साधतील, असा वित्तीय क्षेत्राचा कयास आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना कर्जपुरवठा हा बँका व बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी व्यवसाय संधीच ठरणार आहे.
 ‘आमच्या एकूण कर्जापकी मोठा हिस्सा हा एसएमई उद्योगांना कर्जवाटपाचा आहे,’ असे देशात सर्वात मोठे कर्जवाटप असलेल्या स्टेट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार यांनी ‘लोकसत्ता’ला सागितले. अर्थात एसएमई क्षेत्रातील कर्जाबाबत अनुत्पादित कर्जाचा प्रश्न असला तरी त्यावर उपायही शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘या आधी या प्रकारच्या कर्जाची पत वर्षांतून एकदा ठरविली जात होती. सर्वच प्रकारच्या कर्जाची पत वर्षांतून केवळ एकदा ठरविणे पुरेसे नसल्याने, आमच्या संचालक मंडळाने जेव्हा केव्हा अर्थव्यवस्थेत बदल होतील तेव्हा या बदलांचा काय परिणाम या कर्जदार कंपन्यांवर होईल याचा अभ्यास करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे धोरण अवलंबिले आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
‘काव्‍‌र्ही’च्या वित्तीय सेवा विभागाचे प्रमुख व संचालक अमित सक्सेना यांनीही सांगितले की, ‘सध्याचे आमचे अनेक कर्जदार हे ‘मेक इन इंडिया’मुळे जे उद्योग कार्यक्षम होणे अपेक्षित आहे अशा उद्योग क्षेत्रातील आहेत. ते प्रामुख्याने एसएमई वर्गातील आहेत. हे कर्जवाटप करीत असताना कर्ज अनुत्पादित होणार नाही याची पुरेपूर दक्षता आम्ही घेत असतो.’
या व्यवसायाला काव्‍‌र्हीने २००८ मध्ये सुरुवात केली. हा काळ कुठल्याही वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेसाठी खडतर होता. ‘काळजीपूर्वक आखलेल्या ध्येयधोरणाचा आम्हाला आज फायदा होत आहे. केवळ उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या जोडीला भांडवलाची कार्यक्षमता वाढणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे मत सक्सेना यांनी व्यक्त केले. सध्या वित्तपुरवठा उद्योगाच्या सरासरी वाढीपेक्षा अधिक वेगाने वाढत असलेल्या ‘काव्‍‌र्ही’ला सरकारच्या ‘मेक इन इंडिया’मुळे व्यवसाय विस्ताराच्या संधी खुणावत असल्याचे त्यांनी नि:संदिग्धपणे सांगितले.