कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी बंदमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०,००० कोटी रुपयांचा फटका बसेल, अशी भीती ‘असोचेम’ या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे.तमाम अर्थव्यवस्था आर्थिक मंदीचा सामना करत असताना आता या बंदच्या स्थितीत रुग्णशय्येला खिळणार आहे, असे नमूद करून संघटनेने याचा परिणाम वस्तूंचा पुरवठा तसेच त्यांच्या किंमतींवरही झालेला दिसून येईल, असा इशाराही दिला आहे.
‘असोचेम’ संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धूत यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांच्या या बंदमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे १५,००० ते २०,००० कोटी रुपयांचे नुकसान होणार असून त्याचा फटका देशाच्या सकल उत्पन्नावरही होईल. बँक, विमा, वाहतूक या सेवा क्षेत्रांसह औद्योगिक उत्पादनावरही या बंदचा परिणाम होईल. कृषी क्षेत्रावरील हालचालीही यामुळे मंदावण्याची शक्यता असून भाज्यांसारख्या आवश्यक खाद्यपदार्थाचे दर त्यामुळे अस्थिर होणार आहेत.
पश्चिम बंगाल, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक, तसेच उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये या बंदचे चित्र अधिक गडद होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. बँकांचे कामकाज विस्कळीत होण्याबरोबरच धनादेश वटण्यासही काही दिवसांचा कालावधी लागण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कामगारांशी निगडित अधिक उलाढाल नोंदवली जाणाऱ्या बंदर क्षेत्रावरही बंदमुळे अधिक परिणाम दिसून येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.