एमआयएएलचा उच्च न्यायालयात प्रस्ताव

मुंबईच्या हवाई तळावर पडून असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांचे आलिशान विमानाला दुसऱ्यांदा केलेल्या ई-लिलावातही म्हणावी तशी बोली आली नाही. हे विमान भंगार झाले आहे आणि ते भंगारात काढायला हवे, असे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडतर्फे (एमआयएएल) मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

या विमानासाठी नवा खरेदीदार शोधण्यासाठी आणि त्याकरिता नव्याने ई-लिलाव करण्यासाठी सेवा कर विभागाला मुदतवाढ देण्याऐवजी ते त्याच्या मूळ कंपनीनेच भंगार म्हणून विकत घ्यावे, असे सुचवण्यात आले.

या विमानाला कमी बोली लावली गेली आहे. त्यामुळेच त्याचा नव्याने ई-लिलाव करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या सेवा कर विभागाच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी या विमानला ठरलेली किंमत न मिळाल्याने या विमानाचे पूनर्मूल्यांकन करण्याची आणि त्याचा नव्याने लिलाव करण्याचा निर्णय सेवा कर विभागाच्या आयुक्तांनी घेतला आहे. काही आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी खरेदीमध्ये रसही दाखवला आहे. त्यामुळेच या सगळ्या प्रक्रियेसाठी तीन महिन्यांची मुदत देण्याची विनंती सेवा कर विभागाने न्यायालयाकडे केली.

परंतु सेवा कर विभागाच्या या विनंतीला विमान कंपनी ‘सीजेआय’ आणि ‘एमआयएएल’ने तीव्र विरोध केला. तसेच मल्या यांचे हे विमान भंगार झाले असून त्यासाठी नव्याने ई-लिलाव करण्याऐवजी ते विमानाच्या मूळ कंपनीला भंगार म्हणून विकण्याचा प्रस्ताव ‘एमआयएएल’ने ठेवला. शिवाय विमानतळावर आधीच जागेचा तुटवडा भासत असून या विमानासाठी जागा अडली गेली आहे, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. तर या विमानाचा लिलाव न होण्यामागे त्यासाठी ठरवलेली रक्कम ही आहे. या विमानासाठी २३.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची किंमत लावण्यात आलेली आहे आणि ती अव्यावहारिक असल्याचा दावा विमान कंपनीतर्फे करण्यात आला.