तेल शुद्धीकरण क्षमता विस्तारण्यासाठी देशातील दुसरी मोठी तेल विपणन कंपनी ‘भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (बीपीसीएल) येत्या तीन वर्षांमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याच गुंतवणुकीतून कंपनी तिच्या अस्तित्वातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांसह उत्पादित क्षेत्रे तसेच भारताबाहेरील उत्पादन प्रकल्प राबविणार आहे.
सार्वजनिक तेल व वायू विपणन कंपनी बीपीसीएलच्या भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी मुंबईत पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एस. वरदराजन यांनी बीपीसीएलच्या आगामी योजनांची माहिती दिली.
कंपनीमार्फत अधिक प्रमाणात शुद्ध इंधन निर्मिती व वितरण होण्यासाठी तिच्या देशातील विद्यमान प्रकल्पांसाठी तसेच मोझाम्बिक, ब्राझील व इंडोनेशियातील प्रकल्पांचा विस्तार करणे आवश्यक असून त्यासाठीच ही गुंतवणूक करण्यात येईल, असे ते म्हणाले. कंपनीने गेल्या दशकभरात केलेल्या भांडवली खर्चाच्या सम प्रमाणातील ही नियोजित गुंतवणूक असेल. तर गेल्या तीन वर्षांत केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ती दुप्पट असेल. भारत चार व पाच तरतुदींनुसार इंधन शुद्धीकरणासाठी ही पावले कंपनी उचलत आहे. कंपनीच्या कोची, केरळ येथील प्रकल्पांसाठी १६ हजार कोटी रुपयांची करण्यात येणार असून मध्य प्रदेशमधील बीना येथील इंधन शुद्धीकरण प्रकल्पाची क्षमताही २ दशलक्ष टन प्रति वार्षिकपर्यंत विस्तारली जाणार आहे.
कंपनीने २०१३-१४ मध्ये सर्वाधिक ४,०६०.८८ कोटी रुपयांचा नफा कमाविला असून वार्षिक तुलनेत कंपनीचा बाजारहिस्साही २३.४८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत प्रती समभाग मिळकत ५६.१६ रुपये असणाऱ्या या कंपनीच्या संचालक मंडळाने ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्ताने भागधारकांना १७० टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे.