25 May 2016

ब्रॅण्डेड चहाची बाजारपेठ पाच वर्षांत दुपटीने वाढणार

एकीकडे आरोग्य व खानपानाबाबत वाढती जागृती, तर दुसऱ्या बाजूला चहा-कॉफीसारख्या पेयांचे त्यातही चांगल्या प्रतीच्या

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | February 7, 2013 4:00 AM

एकीकडे आरोग्य व खानपानाबाबत वाढती जागृती, तर दुसऱ्या बाजूला चहा-कॉफीसारख्या पेयांचे त्यातही चांगल्या प्रतीच्या ब्रॅण्डेड चहाचे आकर्षणही भारतीय समाजमनात वाढत चालले आहे. याच पाश्र्वभूमीवर देशांतर्गत ब्रॅण्डेड चहाची बाजारपेठ ही आगामी पाच वर्षांत सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढून ६,००० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
‘सेंटिनेल एक्झिबिशन एशिया प्रा. लि.’ च्या संचालिका प्रीती कपाडिया यांच्या मते खासकरून तरुणाईमध्ये ‘कॅफे कल्चर’चे वाढते आकर्षण असून, स्टारबक्स आणि डंकिन डोनट्स यासारख्या जागतिक शृंखलांचा भारतातील प्रवेश पाहता आगामी तीन वर्षांत कॉफी चेन स्टोअरची संख्या सध्याच्या तुलनेत दुपटीने वाढलेली दिसेल. सेंटिनेल एक्झिबिशनने याच पाश्र्वभूमीवर ‘वर्ल्ड टी अ‍ॅण्ड कॉफी एक्स्पो’चे आयोजन केले असून ते येत्या १५ ते १७ फेब्रुवारी २०१३ या दरम्यान मुंबई प्रदर्शन संकुल, गोरेगाव पूर्व येथे होत आहे.
देशात कॉफीच्या चाहत्यांमध्येही उत्तरोत्तर वाढ होत असून, या बाजारपेठेची दरसाल ६ टक्के दराने वृद्धी होत असल्याचे प्रीती यांनी सांगितले. २०१२ ते २०१७ या पाच वर्षांत चहा-कॉफी बाजारपेठेचा एकत्रित वृद्धीदर जवळपास वार्षिक ११ टक्के असेल. ग्रीन टी, स्वीटनर्स, शुगर फ्री उत्पादनांसारखी वाढती विक्री चहा-कॉफीच्या हव्यासाबरोबरीनेच वाढती आरोग्यविषयक दक्षताही दाखवून देते असे त्यांनी स्पष्ट केले.
‘वर्ल्ड टी अ‍ॅण्ड कॉफी एक्स्पो’मध्ये बाजारपेठेच्या अशाच वेगवेगळ्या पैलूंवर विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, बाजारपेठ तज्ज्ञ, यशस्वी ब्रॅण्ड्सचे प्रवर्तक चर्चा-परिसंवादाद्वारे प्रकाश टाकतील. चहा-कॉफी व्यापाऱ्यांच्या संघटना, उद्योग मंडळे, चहा उत्पादकांचे संघ, चेंबर्सचे प्रतिनिधी, धोरणकर्ते व सनदी अधिकाऱ्यांचाही यात समावेश असेल.

First Published on February 7, 2013 4:00 am

Web Title: branded tea market are going to increase in five years