ब्रिटनचे युरोपीय महासंघातून बाहेर पडणे हे भारताच्या माहिती-तंत्रज्ञान (आयटी) सेवा उद्योगासाठी नकारात्मक घटनाक्रम असून, विशेषत: वित्तीय क्षेत्रात कार्यरत भारतीय सेवा उद्योगाचे लंडनबाहेर अन्य युरोपीय देशांमध्ये स्थानांतर आणि खर्च भार वाढणे अटळ दिसत असल्याचे ‘इन्फोसिस’मधील माजी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोबीची प्रतिक्रिया देताना सांगितले.

भारतीय आयटी उद्योगावर सर्वात मोठा परिणाम हा पौंड स्टर्लिग या ब्रिटनच्या चलनातील घसरणीतून जाणवेल. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत गाळण उडालेल्या पौंडचा लक्षणीय महसुली फटका भारतीय कंपन्यांना बसेल, असे मत इन्फोसिसचे संस्थापक संचालकांपैकी एक आणि सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूकदार असलेले मोहनदास पै यांनी व्यक्त केले.

ब्रिटनमध्ये व्यावसायिक मदार किती यावरून भारतीय आयटी कंपन्यांना पौंडातील घसरणीचा फटका बसेल. अनेक भारतीय कंपन्यांनी लंडनमधून ब्रिटनच्या वित्तीय जगतात बऱ्याच वर्षांच्या प्रयासातून बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. युरोपीय संघापासून ब्रिटनच्या काडीमोडाने संपूर्ण युरोपसाठी महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून लंडनचे स्थान संपुष्टात येणार असून, परिणामी तेथे कार्यरत भारतीय कंपन्यांना अन्य युरोपीय देशांमध्ये कार्यालये उघडून विस्तार साधणे भाग पडेल, असा पै यांचा कयास आहे.

तथापि खुद्द ब्रिटनमधील भारतीय कंपन्यांच्या व्यवसायाची बरकत होणे मात्र शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र चलन घसरणीच्या परिणामी ताबडतोबीच्या नकारात्मक परिणामाचे पारडे जड असेल. पुढील चार ते पाच वर्षांत मात्र अन्य युरोपीय देशांमध्ये फैलावत गेलेल्या व्यवसायाची सकारात्मकताही जमेस धरायला हवी, असे पै यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही उद्योगासाठी अनिश्चिततेचे वातावरण नकोच असते. चलनातील अस्थिरता कोणत्या स्तरावर जाऊन थांबेल. शिवाय युरोपीय संघातून ब्रिटनच्या बाहेर पडण्याचे अन्य सदस्य देशांतून कोणते पडसाद उमटतात, हे सारे अनिश्चित असणे संपूर्ण युरोपात कार्यरत भारतीय आयटी उद्योगासाठी चिंताजनक निश्चितच असल्याचे, इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारकीर्द राहिलेले एस. गोपालकृष्णन यांनी सांगितले.

दीर्घावधीत मात्र ब्रिटनचा युरोपीय संघाशी काडीमोड व्यवसायाच्या नव्या वाटा खुल्या करणारा ठरेल.  वित्तीय जगताचे केंद्र म्हणून संपूर्ण युरोपची लंडनवरील मदार आजवर होती. ती दूर झाल्याने उर्वरित युरोपातील वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीत बदल करणे क्रमप्राप्त ठरेल आणि ही नवीन व्यवसायाची संधी असेल, असा गोपालकृष्णन यांचा कयास आहे.

दुर्दैवाने संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत प्रभाव टाकणारा हा घटनाक्रम असून, त्याबाबत एकेकटय़ा कंपनीला प्रतिबंधात्मक सज्जता करता येणे शक्य नाही. त्यामुळे धुरळा शांत होईपर्यंत वाट पाहणे आणि आघात सोसणे अपरिहार्यच आहे.

–  एस. गोपालकृष्णन,

मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक इन्फोसिस टेक्नॉलॉजीज ब्रसेल्स आणि लंडनमधील धोरणकर्त्यांनी आगामी पावलांबाबत सुस्पष्टता आणणारे संकेत ताबडतोबीने द्यावेत, असे आमचे आर्जव आहे. ब्रिटन आणि सबंध युरोपात गुंतवणूक व व्यवसाय अविरत सुरू राहण्यासाठी उद्योगांना आवश्यक निर्धास्तता प्रदान करणारे वक्तव्य उभयतांकडून यायला हवे.

–  आर. चंद्रशेखरन, अध्यक्ष नासकॉम

 

arth-chart