चार वर्षांत एकूण  १२ हजार कर्मचारी नोकऱ्या गमावणार! ’  २०० शाखांना टाळे लागणार!

लॉइड्स बँकिंग ग्रुप (एलबीजी) या ब्रिटनमधील नामांकित वित्त समूहाने, ‘ब्रेग्झिट’पश्चात प्रतिकूल स्थितीचा सामना करता यावा म्हणून विद्यमान आर्थिक वर्षांत ३,००० हून अधिक नोकरकपातीचा कटू निर्णय घेणे भाग ठरेल, असे गुरुवारी स्पष्ट केले. बँक ऑफ इंग्लंड या तेथील मध्यवर्ती बँकेकडून आगामी आठवडय़ात अपेक्षित व्याज दरकपातीच्या निर्णयाचे पूर्वानुमान म्हणूनही हा निर्णय घेतला गेला असून, ब्रिटनमध्ये कार्यरत अन्य बँकांकडून अशाच प्रकारच्या निर्णयाचे अनुकरण केले जाण्याची शक्यता आहे.

एलबीजीने आखलेल्या व्यवसाय पुनर्रचना आराखडय़ानुरूप यापूर्वीही नोकरकपात राबविली असून, हा आराखडा २०१७ आर्थिक वर्षांच्या अखेपर्यंत विस्तारण्याचा आणि आणखी ३,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिले जाण्याचा निर्णय बँकेने प्रसिद्धिमाध्यमांना दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केला. २०१४ सालापासून अंमलबजावणी सुरू झालेल्या या पुनर्रचना आराखडय़ानुरूप २०१७ सालाच्या शेवटापर्यंत बँकेत राबविल्या गेलेल्या एकूण कर्मचारीकपातीचे प्रमाण १२,०००च्या घरात जाईल. जवळपास २०० शाखांना बँकेकडून टाळे लावले जाणार आहे.

ब्रेग्झिटपश्चात निर्माण झालेल्या अनिश्चिततेतून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपुढे पेचाची स्थिती निर्माण केली आहे, याची लॉइड्सच्या प्रसिद्धिपत्रकाने कबुली दिली आहे. बँक ऑफ इंग्लंडने पुढील आठवडय़ात नियोजित पतधोरणांत व्याजाचे दर आणखी खाली आणून ते ०.२५ टक्के अशा विक्रमी तळात नेले जातील, असे अपेक्षिले जात आहे. ही स्थिती बँकिंग व्यवसायाची आणखीच कोंडी करणारी ठरणार आहे.