• गुंतवणूकदारांना आजमावणारा देशातील पहिला शेअर बाजार
  • सूचिबद्धता मात्र स्पर्धक ‘एनएसई’वर!

तब्बल १४१ वर्षे जुना देशातील सर्वात मोठा शेअर बाजार ‘बीएसई’, लवकरच भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारा देशातील पहिलाच बाजारमंच असेल. बीएसईची प्रारंभिक खुली भागविक्री येत्या सोमवार २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान प्रत्येकी ८०५ ते ८०६ रुपयांदरम्यान सुरू होत आहे. भागविक्रीतून १२४३ कोटी रुपये भांडवल उभे राहणे अपेक्षित आहे.

चालू वर्षांतील ही पहिलीच भागविक्री असून, गुंतवणूकदारांना यातून दीघरेद्देशी तसेच सूचिबद्धतेसमयी चांगल्या लाभाची अपेक्षा करता येईल, असे भागविक्रीसाठी निश्चित किंमत पट्टा व मूल्यांकनाबाबत बोलताना बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी आशीषकुमार चौहान यांनी सांगितले. या भागविक्रीसाठी किमान १८ समभागांसाठी आणि त्या पुढे १८च्या पटीत व्यक्तिगत गुंतवणूकदारांना अर्ज दाखल करता येईल.

गुंतवणूकदारांना आजमावणाऱ्या देशातील या पहिल्या शेअर बाजाराची सूचिबद्धता मात्र स्पर्धक ‘एनएसई’वर होणार आहे. मल्टिकमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया हा बाजारमंचही सूचिबद्ध असला तरी तो फक्त वस्तू वायदा व्यवहारांसाठीच आहे. शिवाय बीएसईचा स्पर्धक ‘एनएसई’ने आपल्या भागविक्रीच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यात ‘सेबी’कडून मंजुरी मिळविली आहे. तब्बल १०,००० कोटी रुपये अशी अलीकडच्या काळातील सर्वात मोठी भागविक्री एनएसईद्वारे लवकरच प्रस्तुत केली जाणे अपेक्षित आहे.

बरोबरीनेच बीएसईची उपकंपनी आणि देशातील दोन मोठय़ा डिपॉझिटरी सेवांपैकी एक असलेली ‘सीडीएसएल’ही लवकरच खुल्या बाजारात समभागांची विक्री घेऊन दाखल होत आहे.