जागतिक प्रतिकूलतेपायी डिसेंबरनंतरची सर्वात मोठी गटांगळी

गेल्या तीन महिन्यांतील सर्वात मोठी आणि सलग तिसऱ्या सत्रात, बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स ३१८ अंशांनी घरंगळला. जागतिक प्रतिकूल घडामोडींबाबत सावध पवित्रा घेत गुंतवणूकदारांनी विक्रीचा परिणाम म्हणून सेन्सेक्स २९,१६७.६८ पातळीवर स्थिरावला. सलगपणे घसरणाऱ्या बँकिंग समभागांबरोबरीनेच, ग्राहकोपयोगी उत्पादने, वाहन व धातू क्षेत्रातील समभागही परिणामी गडगडले.

बुधवारच्या घसरणीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही ९,१०० ही भावनिकदृष्टय़ा महत्त्वाची पातळी सोडली. ९१.०५ अंश म्हणजे १ टक्का घसरणीसह निफ्टी ५० निर्देशांक ९,०३०.४५ पातळीवर दिवसअखेर स्थिरावला. प्रमुख घसरलेल्या समभागांमध्ये निर्देशांकात वजनदार स्थान असलेल्या भारती एअरटेल ३.१८ टक्क्यांच्या तुटीसह आघाडीवर राहिला. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, आयटीसी, आयसीआयसीआय बँक हे समभागही दोन टक्क्यांच्या घरात घरंगळले. केवळ ल्युपिन, सिप्ला, सन फार्मा, डॉ. रेड्डीज या औषधी समभागांना मागणी मिळून त्यांचे भाव उंचावलेले आढळून आले.

उत्तर कोरियात पुन्हा एकदा अण्वस्त्र स्फोटाच्या चाचणीचे वृत्त, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संभाव्य कर कपातीचे टाकले जाणारे पाऊल आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू तिमाहीत प्रत्यक्षात ६.७ टक्के म्हणजे सात टक्क्यांखालीच घुटमळण्याचे व्यक्त होत असलेले अंदाज असे घटनाक्रम बाजारातील निरुत्साहाला खतपाणी देणारे ठरले.

अमेरिकेत ट्रम्प यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या पावलांबाबत अद्याप सुस्पष्टता आलेली नाही. उलट त्यांच्या अतार्किक स्वभावाला अनुरूप काही विपरीत धोरणे घेतली जाण्याच्या भीतीने अनिश्चिततेत भर पडत चालली आहे. परिणामी जगभरातील प्रमुख भांडवली बाजारात नरमाईचे चित्र दिसून आले. भारतातही निश्चलनीकरणाच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था पुरती सावरली असल्याचे चित्र अद्याप पुढे आलेले नाही. उलट बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाबाबतची चिंता अधिक गहिरी बनली असल्याचेच दिसून येते, अशीही विश्लेषकांनी बाजारातील सध्याच्या सलगपणे सुरू असलेल्या घसरणीची कारणे दिली आहेत.

बुधवारी बाजारातील घसरणीने सार्वत्रिक रूप धारण केलेले दिसले. आधीच्या दोन दिवसांत घसरण ही निवडक बँकिंग आणि बिनीच्या समभागांपुरती मर्यादित होती. त्या उलट बुधवारी  घसरणीत छोटय़ा व व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडून विक्रीला जोर चढलेला दिसला. त्या परिणामी मधल्या व शेवटच्या फळीतील मिड व स्मॉल कॅप समभागांनी सपाटून मार खाल्ला. मुंबई शेअर बाजारात हे निर्देशांक अनुक्रमे ०.९५ टक्के व ०.९० टक्के असे घसरणीत राहिले.

तीन दिवसांत ४८१ अंश गमावले..

गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने ४८१.२१ अंश गमावले आहेत. बुधवारची सेन्सेक्सची ३१७.७७ अंशांची घसरण ही तीन महिन्यांपूर्वी २ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या ३२९.२६ अंशांच्या घसरणीनंतरची दुसरी मोठी गटांगळी आहे.