६२ टक्के लोकांच्या कमाईचे २० टक्के समभाग गुंतवणुकीत; सर्वेक्षणाची माहिती

शेअर बाजाराच्या चमकदार कामगिरी गुंतवणूकदारांना भुरळ घालणारी ठरली आहे. बहुतांश छोटे गुंतवणूकदार हे अन्य कोणत्याही पर्यायांपेक्षा समभाग गुंतवणुकीला अधिक पसंती देतात आणि कमाईतील २० टक्क्य़ांपर्यंत हिस्सा शेअर बाजार गुंतविण्याला प्राधान्य देतात, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ‘इक्विटी कल्चर’ अर्थात समभागांमध्ये गुंतवणुकीच्या संस्कृतीची कास धरून भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून सुरू असलेला गुंतवणूक जागर आणि दलाल स्ट्रीटवरील निरंतर तेजीच्या वाऱ्याचा हा परिणाम असल्याचे दिसून येते.

थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात किंवा करू इच्छिणारे यांचे प्रमाण तब्बल ८३.४५ टक्के असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. जिओजित सिक्युरिटीज या दलाली पेढीने ऑनलाइन धाटणीचे हे सर्वेक्षण केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने चालू वर्षांत ३०,००० ची पातळी ओलांडली त्या वेळी केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात, तीन लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी सहभाग केल्याचे जिओजितचे म्हणणे आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे ६२ टक्के लोकांनी त्यांच्या उत्पन्नाचा २० टक्के हिस्सा हा समभागांतील गुंतवणुकीसाठी वापरत असल्याचे म्हटले आहे.

विद्यमान २०१७ सालात प्रमुख शेअर निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी यांची उत्तरोत्तर नव्या सार्वकालिक उच्चांकाच्या दिशेने आगेकूच सुरू आहे. निर्देशांकांनी या वर्षांत केलेली १८ टक्क्यांची कमाई पाहता, जगातील एक सर्वोत्तम कामगिरी करीत असलेल्या भांडवली बाजारात दलाल स्ट्रीटने स्थान मिळविले आहे. हे पाहता, साधारण ८४ टक्के लोकांना त्यांचा पैसा हा समभाग गुंतवणुकीत असावा असे वाटत असल्यास ते आश्चर्यकारक ठरत नाही. मात्र त्यापैकी ५९.२५ टक्के लोक हे वरकड पैसा असेल तरच बाजारात गुंतवणूक करतात असे सांगतात. तर केवळ २० टक्के हे लोक हे मासिक स्तरावर नियमितपणे गुंतवणूक करीत असल्याचे सांगतात. तथापि, बाजारात थोडी घसरण येईपर्यंत वाट पाहण्याचे आणि त्यानंतर दीर्घ मुदतीचा दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करावी, असे मत असणारे ६५ टक्के गुंतणूकदार सर्वेक्षणांत आढळून आले. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत दीर्घावधीचा दृष्टिकोन मात्र सर्वेक्षणांत सहभागी ३१.६ टक्के लोकांकडूनच व्यक्त करण्यात आला.

समभाग गुंतवणुकीपाठोपाठ दुसऱ्या पसंतीवर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक असून, ५७.२१ टक्के लोक त्यांची काहीशी गुंतवणूक या पर्यायात असल्याचे सांगतात. तथापि, अधिक जोखीम घेऊन अधिक परतावा मिळविण्यासाठी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविणारे ६५.५ टक्के लोक असल्याचेही सर्वेक्षणांत आढळून आले. केवळ २४ टक्के लोकांनी थेट शेअर बाजारापेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही चांगली असल्याचे म्हटले आहे.

परिपक्वतेचा प्रत्यय

या सर्वेक्षणातील काही बाबी आजचा गुंतवणूकदार हा जोखीमेबाबत दक्ष आणि परिपक्व बनला असल्याचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. डेरिव्हेटिव्हज् (फ्युचर्स /ऑप्शन) हा सर्वाधिक जोखमीचा प्रकार असल्याचे सांगून, छोटे गुंतवणूकदार यापासून पूर्णपणे फारकत घेऊन असल्याचे केवळ ‘डे ट्रेडिंग’ अर्थात शेअर बाजारात खरेदी केल्याच्या दिवशीच विक्री करण्याच्या प्रघाताबाबतही बहुतांश  नापसंती दिसून येते. सर्वेक्षणांत सहभागी केवळ १४.५५ टक्के लोकांचा या बाजूने कौल आहे, तर ६२ टक्के लोकांनी असे व्यवहार अत्यंत जोखमीचे असल्याचे नमूद करून, त्यापासून फारकत घेण्याचा त्यांचा कल सर्वेक्षणांत आढळून आला आहे.