सेन्सेक्समध्ये १२२ अंशांची भर

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वाढत्या बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने सरकारी स्तरावर ठोस उपाययोजना होण्याची आशा पुन्हा एकदा भांडवली बाजारात उमटली. सलग दुसऱ्या सत्रातील शतकाहून अधिक अंशवाढीने मुंबई निर्देशांक आता २९,५००च्या पुढे गेला आहे. तर जवळपास अर्धशतकी निर्देशांक वाढीने निफ्टीची आगेकूच बुधवारीही ९,१०० पुढील राहिली.

१२१.९१ अंश कमाईने २९,५३१.४३ अशा आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर सेन्सेक्स पोहोचला. ४३ अंशवाढीने निफ्टी ९,१४३.८० पर्यंत स्थिरावला. मुंबई निर्देशांकाने यापूर्वी २९,५१८.७४चा टप्पा २० मार्च रोजी गाठला होता. सत्रातील सेन्सेक्सची झेप २९,५५४.३९ राहिली, तर निफ्टी व्यवहारातील उच्चांक ९,१५३.१५ होता.

बँक समभागांचे मूल्य बुधवारीही वाढले. सेन्सेक्समध्येही स्टेट बँक  तेजीसह आघाडीवर राहिली. बँकांच्या बुडीत कर्जाबाबतची समस्या लवकरच दूर होण्याची आशा बाजारात झालेल्या व्यवहारांमध्ये स्पष्टपणे उमटली. आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, कोल इंडिया, एचडीएफसी लिमिटेड आदीसह सेन्सेक्समधील १६ समभाग तेजीच्या यादीत राहिले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, पायाभूत सेवा, भांडवली वस्तू, पोलाद, सार्वजनिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वाढले. डॉलरच्या तुलनेत रुपया भक्कम होऊनही माहिती तंत्रज्ञान समभागांचे मूल्य वाढले.

भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार होतील. आशियाई तसेच युरोपातील बाजारांमध्येही बुधवारी तेजी राहिली.

वाहन कंपन्यांचे समभाग उतरणीला

भारत स्टॅण्डर्ड-३ प्रदूषण मानांकन असलेल्या वाहनांची विक्री तसेच नोंदणी येत्या १ एप्रिलपासून करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मज्जाव घातला. या आदेशाच्या हलकल्लोळात भांडवली बाजारातील सूचिबद्ध वाहन कंपन्यांचे समभाग चांगलेच ढवळून निघाले. वाहन कंपन्या आणि संबंधित क्षेत्रातील आघाडीच्या समभागांचे मूल्य ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

untitled-6