मेच्या प्रारंभाप्रमाणेच महिना संपत येताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक उसळून,  त्यांच्या विक्रमी घोडदौडीकडे अग्रेसर झाले आहेत. गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीच्या दिवशी भांडवली बाजाराने इतिहास घडविला. सेन्सेक्ससह निफ्टी हे गुरुवारी मोठय़ा तेजीसह त्यांच्या नव्या शिखरांवर पुन्हा स्वार झाले.

मोदी सरकारच्या स्थापनेची तीन वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला विक्रमी टप्प्यावर पोहोचून भांडवली बाजाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा आगामी पथदर्श उज्ज्वल असल्याची प्रतिक्रिया दिल्याचे मानले जात आहे.

सेन्सेक्सने एकाच व्यवहारात तब्बल ४४८.३९ अंश झेप घेतल्याने मुंबई निर्देशांक प्रथमच ३०,७९३.४३ वर पोहोचला. याद्वारे त्याने यापूर्वीचा ३०,७१२.३५ हा टप्पाही मागे टाकला. तर गुरुवारच्या एकाच व्यवहारातील जवळपास ४५० अंश वाढ ही गेल्या दोन महिन्यातील सर्वोत्तम राहिली. मुंबई निर्देशांकाची यापूर्वीची सत्रतेजी १४ मार्च रोजी ४९६.४० अंशांची होती. गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०,७९३.४३ पर्यंत झेपावला होता. गुरुवारच्या निर्देशांक वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १४९.२० अंश वाढीमुळे प्रथमच ९,५०९.७५ पर्यंत पोहोचला. व्यवहारात ९,५२३.३० अंशपर्यंत मजल मारणाऱ्या निफ्टीचा ९,५०० पुढील स्तर दिवसभर कायम होता.

भविष्यातील व्याजदर वाढीबाबत सावधगिरी बाळगली जाईल, असे संकेत अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हने दिल्यानंतर येथील भांडवली बाजाराला स्फुरण चढले. गेल्या सलग दोन सत्रांपासून सातत्याने घसरलेल्या बाजारात कमी मूल्यातील समभागांची खरेदी करण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी अंगीकारले.

दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दीड टक्क्यांहून अधिक वाढ गुरुवारी नोंदविली. सेन्सेक्सने गेल्या सलग दोन व्यवहारात २६९.३३ अंश घसरण नोंदविली आहे. तर निफ्टी ९,४०० च्याही खाली गेला होता. गुरुवारच्या मुंबई निर्देशांकाच्या प्रवासामुळे सेन्सेक्सचा चालू महिन्याच्या सुरुवातीला असलेला यापूर्वीचा सर्वोच्च टप्पाही मागे पडला.

सततच्या दोन व्यवहारांतील घसरणीनंतर भांडवली बाजाराची महिनाअखेरच्या वायदापूर्तीच्या व्यवहारांची सुरुवात तेजीसह झाली. सेन्सेक्समध्ये या वेळी शतकी अंश भर पडली होती. मुंबई निर्देशांक या वेळी ३०,५०० च्या काठावर होता. तर निफ्टी ९,४०० च्या वेशीवर होता.

मुंबई निर्देशांकांची गुरुवारची झेप व सत्रअखेरचा स्तर हा इतका लक्षणीय होता की, सेन्सेक्समधील ३० पैकी २२ कंपन्यांचे समभाग हे विक्रमी मूल्याला पोहोचले. तर मुंबई शेअर बाजारातील ८८ समभागांनी नव्यानेच वर्षभराच्या उच्चांकाला स्पर्श केला. दुपारनंतर निर्देशांकांचा कमाईचा वेग वाढला.

आता निफ्टीच्या दसहजारी शिखराला गवसणीचे दावे

मुंबई : गुरुवारच्या तेजीमुळे भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांच्या आगामी प्रवासाचे अंदाजाचे मनोरेही आता उंचावले आहेत. वेगवेगळ्या कयासांनुसार राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – ‘निफ्टी ५०’ हा डिसेंबर २०१७ पर्यंत १०,००० च्या शिखराला गवसणी घालेल. तर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स येत्या महिन्यात, अथवा जूनमध्ये ३१,००० पर्यंत पोहोचेल, असे बाजारतज्ज्ञांकडून भाकित करण्यात आले आहे.

मिड-स्मॉल कॅपमध्ये आश्वासक बहर

प्रमुख निर्देशांकांसह भांडवली बाजारातील मिड व स्मॉल कॅपनेही गेल्या दोन व्यवहारांतील घसरणीतून गुरुवारी उसंत घेतली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकातील तेजी एक ते दोन टक्क्यांपर्यंत राहिली. किरकोळ गुंतवणूकदारांची अधिक पसंती असलेले हे निर्देशांक सलगच्या व्यवहारात मोठय़ा फरकाने खाली आले आहेत.

गुरुवारी मुंबई शेअर बाजारात  स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम, पोलाद क्षेत्रातील समभागांकरिता या वेळी मागणी नोंदली गेली. या निर्देशांकांमध्ये बुधवारच्या तुलनेत ८ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदली गेली.

सेन्सेक्समधील लार्सन अॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, गेल इंडिया, टीसीएस, स्टेट बँक, विप्रो, मारुती, एशियन पेंट्स समभागांचे मूल्य ५ टक्क्यांपर्यंत वाढले.