जाणारा प्रत्येक दिवस माणसाला वृद्धत्वाकडे घेऊन जातो. अगदी त्या उलट सरलेल्या ५०, २०० दिवसांतील दु:खद आठवणींना बाजूला सारून निफ्टी सळसळत्या तारुण्यात पदार्पण करत आहे. मंदीची कात टाकून उभारीचा हा कल आहे काय?

दिवस तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे. कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या गीतातील या ओळी निफ्टीला चपखल लागू पडतात. हा उंच झोका ८,५००-८,६०० पर्यंतचा असेल.

परंतु ‘उंच तिचा झोका चुकतो काळजाचा ठोका’ अशी ही अवस्था आहे. जोपर्यंत निफ्टीला ८,२०० ते ८,३०० दरम्यान भरभक्कम आधार टप्पे आहेत. तोपर्यंत झोक्याची गती भले कमी झाली तरी चालेल. पूर्वी भाकीत केल्याप्रमाणे एक संक्षिप्त स्वरूपाची घसरण अपेक्षित आहे. ही घसरण शुक्रवारपासून सुरू झाली आहे. मात्र ८,२००-८,३००चा आधार घेऊन हा झोका पुन्हा ८,५००-८,६०० पर्यंत जाईल.

एकदा झोक्याची गती ८,२०० खाली जाऊन काहीसे सातत्य राखून टिकली तर मात्र तेजीवाल्यांचा काळजाचा ठोका चुकेल व वरील सुंदर भावगीताचं रूपांतर ‘हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा’ या अंगाई गीतात होऊन निफ्टी ८,००० पर्यंत खाली येणे शक्य आहे.

लक्षवेधी समभाग..

  • एशियन पेंट्स (शुक्रवारचा बंद भाव रु. ९६७.२०)
    • तिमाही निकाल २३ जानेवारीला
    • कल निर्धारण पातळी : रु. ९२०

 

तिमाही निकालाबाबत तीन शक्यता-

  • निकाल उत्कृष्ट : निश्चलनीकरणाचा घाव आणि या कंपनीचा कच्चा माल तेलजन्य पदार्थ असून त्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात भडकलेल्या असूनही व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर भरीव नफा व विक्री उत्पन्न दाखविल्यास भाव रु. १०००-१०५० पर्यंत झेपावेल. १०५०च्या वर भाव १५ दिवस टिकल्यास आणि भावाला उलाढालीचा आधार असल्यास रु. १०८०- ११५०- ११८० पर्यंत मजल जाईल.
  • २. निकाल लक्षणीय नसल्यास रु. ९२०-९६०
  • ३. निराशाजनक निकाल : रु. ९२०चा आधार स्तर तोडून रु. ८५० ते ८०० पर्यंत घसरण होईल.

एमएमटीसी लि. : ( शुक्रवारचा बंद भाव रु. ६४.८०)

 

समभागाचा आजचा बाजारभाव २०० (४६), १०० (५०), ५० (५४) आणि २० दिवस (६३) या सर्व दिवसांच्या चलत सरासरीवर आहे.

गेल्या काही दिवसांत समभागाची अल्पावधीत भरीव वाढ झाली असल्याने गुंतवणूकयोग्य रकमेला चार तुकडय़ांत विभागून रु. ६० ते ६५ दरम्यान दीर्घकालीन गुंतवणूक करावी. एमएमटीसीचे पहिले वरचे उद्दिष्ट रु. ७५ ते ८० आणि त्यानंतर रु. ९५ असेल या गुंतवणुकीला रु. ५४ चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.