बडय़ा गुंतवणूकदारांकडून आजमावला गेलेला एक पर्याय ‘पार्टिसिपेटरी नोट्स’ अर्थात पी-नोट्सवरील ‘सेबी’च्या नव्या नियमावलीसंबंधाने बळावलेली चिंता तसेच जोडीला नफेखोरीच्या परिणामी मंगळवारच्या व्यवहारात भांडवली बाजारात सलग तीन दिवस सुरू राहिलेल्या ऐतिहासिक उच्चांकी दौडीला लगाम बसला. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही निर्देशांक त्यांच्या शिखर टप्प्यापासून ढळले, इतकेच नाही तर त्यांनी गेल्या दीड महिन्यातील सर्वात मोठी आपटीही नोंदविली.
१६१.४९ अंश घसरणीसह सेन्सेक्स २८,५००च्या आत २८,३३८.०५ वर, तर ६७.०५ अंश आपटीसह निफ्टी ८५००च्या खाली ८४६३.१० वर स्थिरावला. सेन्सेक्सची तर १६ ऑक्टोबरच्या एकाच व्यवहारातील ३५० अंश घसरणीनंतरची मंगळवारची आपटी मोठी ठरली. सलग तीन व्यवहारांत मुंबई निर्देशांक ४६६.६९ अंशांनी वधारला होता.
सेन्सेक्स २८,५००च्या तर निफ्टी ८५००च्या वर जाताना सोमवारी ऐतिहासिक टप्प्यावर विराजमान झाला होता. मंगळवारची सुरुवातही सेन्सेक्सने त्यापुढे जात २८,५२०.७६ ने केली. लगेच तो २८,५४१.२२ पर्यंत झेपावलाही. यानंतर मात्र त्यात घसरण नोंदली गेली व सेन्सेक्स दिवसअखेर नकारात्मक स्थितीत स्थिरावला.
विदेशी गुंतवणूकदारांचा पी-नोट्स हा पसंतीचा भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा पर्याय आहे. मात्र वाढत्या काळ्यापैशाच्या भीतीने यापुढे याद्वारे गुंतवणूक करताना माहिती पुरविण्यासह अत्यावश्यक उपाययोजना करण्याचे आदेश सेबीने जारी केल्याने बाजारात नाराजी पसरली. त्यातच दोनच दिवसांनी (गुरुवारी) महिन्यातील वायदापूर्तीचे व्यवहार होणार असल्याने गुंतवणूकदारांनीही नफेखोरीचा मार्ग अवलंबिला.
मुंबई शेअर बाजारात स्थावर मालमत्ता, ऊर्जा, पोलाद, ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, भांडवली वस्तू, वाहन या क्षेत्रातील समभाग घसरले. यामध्ये स्थावर मालमत्ता सर्वाधिक ३.३५ टक्क्य़ांनी खाली आला. तर सेन्सेक्समधील ३० पैकी निम्मे समभागांचे मूल्य रोडावले. त्यातही आयटीसीसह टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, एल अ‍ॅण्ड टी अशा संमिश्र समभागांचा समावेश राहिला.

सिगारेट समभागांचा धूर
सुटय़ा सिगारेटच्या विक्रीवर कायद्याने र्निबध येण्याच्या धास्तीने गुंतवणूकदारांनी मंगळवारी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री केली आणि या समभागांनी व्यवहारात तब्बल नऊ टक्क्य़ांपर्यंतची घसरण दाखवली. आघाडीची सिगारेट उत्पादक कंपनी आयटीसीचा समभाग ७ टक्क्य़ांपर्यंत घसरला. तर या क्षेत्रातील अन्य सूचिबद्ध कंपन्यांचे समभागही मोठय़ा फरकाने घसरले.
आयटीसी                   रु ३४८.६०        -४.९९%
गॉडफ्रे फिलिप्स         रु २९६५.९५      -८.९०%
गोल्डन टोबॅको           रु ३७.०५          -७.६१%
व्हीएसटी इंडस्ट्रीज      रु १८५९           -०.५६

खुल्या सिगारेटच्या विक्रीवर र्निबध आणण्याबाबत तज्ज्ञ समितीने केंद्र सरकारला शिफारस केली आहे. प्रत्यक्षात तसा निर्णय झाल्यास सिगारेट उत्पादक कंपन्यांवर लागू करण्यात येणाऱ्या करांइतकीच ही बाब गंभीर असेल. या कंपन्यांचे सध्याच २५ हजार कोटींचे कर योगदान आहे. प्रस्तावित र्निबधांमुळे सिगारेटच्या विक्रीवर विपरीत परिणाम लक्षात घेता या क्षेत्रातील समभागांचे मूल्य मंगळवारी बाजारात ढासळले.
’ हिरेन धाकन,
निधी व्यवस्थापक, बोनान्झा पोर्टफोलियो

डॉलरमागे ६२ ला पोहोचून रुपया दिवसअखेर सावरला
मुंबई: गेले काही दिवस डॉलरच्या तुलनेत ६२च्या काठावर प्रवास करणाऱ्या रुपयाने मंगळवारच्या व्यवहारात हा टप्पा गाठलाच. मात्र दिवसअखेर तो ८ पैशांनी उंचावत ६१.८६ वर स्थिरावला. डॉलरसमोर गेल्या अनेक सत्रांपासून रुपया ६२च्या वेशीपर्यंत कमकुवत होत होता. मात्र त्याने हा स्तर ओलांडला नव्हता. मंगळवारी मात्र रुपयाने सुरुवातीच्या व्यवहारातच ६२ची वेस ओलांडली. सोमवारी एकदम १८ पैशांनी आपटणाऱ्या रुपयाने मंगळवारची सुरुवातही ६१.९५ अशी नरमाईने केली. सुरुवातीच्या व्यवहारात ६२.०४ पर्यंत घसरणीनंतर मात्र सत्रअखेर त्यात सोमवारच्या तुलनेत किरकोळ वाढ राखली गेली.