जागतिक बाजारातील तेजीच्या जोरावर येथेही समभागांची जोरदार खरेदी आठवडय़ाच्या सुरुवातीलाच अनुभवली गेली. परिणामी एकाच व्यवहारात तब्बल ३०० हून अधिक अंशाने वाढ नोंदवित मुंबई निर्देशांक गेल्या दीड सप्ताहाच्या वरच्या टप्प्याला पोहोचला.
सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्स सोमवारी ३२९.९५ अंशाने वाढून २७,५०० च्या पुढे, २७,७०१.७९ पर्यंत पोहोचला. तर जवळपास शतकी वाढीसह, ९८.८० अंशाने निफ्टीने ८,३०० चा टप्पा पार करत ८,३२४.००० वर गेला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्याने अनेक विदेशी प्रमुख निर्देशांकात तेजी होती. त्याच धर्तीवर येथेही गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केली.
येत्या आर्थिक वर्षांत ६ टक्के विकास दर राखणाऱ्या भारतात लवकरच ९ ते १० टक्के अर्थवेग राखला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सोमवारी स्पष्ट केल्याने बाजारात अधिक उत्साह संचारला. त्याचबरोबर वस्तू व सेवा कर तसेच विमा विधेयकाबाबत संसद अधिवेशनात प्रगती होण्याची आशाही गुंतवणूकदारांना आहे.
सेन्सेक्समध्ये महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, कोल इंडिया, एचडीएफसी, भेल, गेल, एनटीपीसी यांना भाव राहिला. सोमवारी क्षेत्रीय निर्देशांकांमधील सर्व १२ निर्देशांक ०.१३ ते १.४८ टक्क्य़ांपर्यंत उंचावले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारात वायदा वस्तूंच्या किंमती वाढल्याने पोलाद निर्देशांक अधिक चमकदार कामगिरी करत होता. तर निर्देशांकांमध्ये १.४८ टक्क्य़ांसह ऊर्जा निर्देशांक वरचढ ठरला.

गेल्या तीन व्यवहारात सेन्सेक्स ९९१.६६ अंशांनी उंचावला आहे. भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी प्राथमिक माहितीनुसार, ६६८.८५ कोटी रुपयांचे समभाग विकले. तर स्थानिक संस्थागत गुंतवणूकदारांची भर ३८९ कोटींची राहिली.

रुपया उंचावला
डॉलरच्या तुलनेत रुपया आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ५ पैशांनी उंचावला. स्थानिक चलन ६३.२५ रुपयांवर स्थिरावले. जागतिक बाजारात डॉलरचे अन्य चलनांसमोरील कमकुमवतताही रुपयाला स्थैर्य देऊन गेली. सोमवारच्या सत्रात रुपया ६३.१३ ते ६३.३२ दरम्यान प्रवास करता झाला.
कच्चे तेल वधारले
प्रति पिंप ६० च्या खाली प्रवास करत चिंता निर्माण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दराने सोमवारी काहीशी उसंत घेतली. बाजारात काळ्या सोन्याचा दर आता ६२ डॉलर प्रति पिंपपर्यंत पोहोचू लागला आहे. तेल ६० च्या वर गेले असले तरी अद्याप ते वर्षभराच्या तळातच आहे.