आखाती देशात येमेनवरील हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य तणावाने आणि त्या परिणामी खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनी एकाच दिवसात सुमारे पाच टक्क्य़ांच्या उसळीचे विपरीत पडसाद जगभरात सर्वच भांडवली बाजारावर उमटताना दिसले. स्थानिक भांडवली बाजारात तर सेन्सेक्सने ६५४ अंशांची तीन महिन्यांतील सर्वात मोठय़ा आपटीसह, स्थानिक चलन रुपयाही डॉलरच्या तुलनेत ३४ पैशांनी गडगडला. त्या उलट अस्थिरतेच्या स्थितीत सुरक्षिततेचा सोन्याला असलेला शाश्वत लौकिक पुन्हा भाव खाताना दिसून आला. स्थानिक सराफ बाजारात गुरुवारी सोने-चांदीच्या भाव पुन्हा चमक मिळविताना दिसून आले.

शेअर बाजारात चिंतित विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा सुरू केल्याने सेन्सेक्स गुरुवारी तब्बल ६५४ अंशांनी गडगडला. ही निर्देशांकातील गेल्या तीन महिन्यांतील सर्वात मोठी आपटी आहे, तर अर्थसंकल्पापश्चात सलग सातव्या दिवशी बाजारात सुरू राहिलेली ही घसरण आहे. सलग सात दिवसांत गमावलेल्या एकूण १,२७८ अंशांनी सेन्सेक्स २८ हजाराच्या खाली रोडावला आहे.
या घटनेच्या परिणामी सर्वच आशियाई आणि युरोपच्या बाजारात मोठी घसरण दिसून आली, परंतु स्थानिक शेअर बाजारातील मार्च महिन्याच्या वायदा व्यवहारांच्या समाप्तीचा दिवसही या जागतिक प्रतिकूल घडामोडींशी जुळून आल्याने आपल्या निर्देशांकातील घसरणीची मात्रा मोठी राहिली. e06सेन्सेक्समधील सव्वादोन टक्क्य़ांच्या आपटीसह निफ्टी निर्देशांकही १८९ अंश (२.२१ टक्के) घसरणीसह ८,३४२.१५ या अडीच महिन्यांपूर्वीच्या नीचांक स्तरावर येऊन स्थिरावला.
स्थानिक बाजारातील घसरण इतकी सर्वव्यापी होती की, व्यवहार झालेल्या प्रत्येक तीन समभागांमध्ये दोन समभाग हे घसरणीचे होते. गुरुवारी मुंबई शेअर बाजारात १८२२ समभाग घसरण  दाखविणारे, तर त्या उलट ९७९ समभागात काहीशी भाववाढ दिसून आली.
उल्लेखनीय म्हणजे ५२ सप्ताहातील नीचांकाला गवसणी घालणाऱ्या समभागांची संख्या १३०च्या घरात जाणारी राहिली.

ग टां ग ळी ची   का र णे ..
सौदी अरबने इराणचे पाठबळ असलेल्या शिया बंडखोरांना (हुथी) जरब म्हणून येमेनवर हवाई हल्ले केल्याची परिणती म्हणून आखातात युद्धाचा भडका उडण्याच्या भीतीचे हादरे जगभरातील प्रमुख भांडवली बाजारात जाणवले.
****
गेल्या काही दिवसांपासून स्थिर पातळीवर असलेल्या ब्रेन्ट क्रूड तेल किमती बाजारातील प्रारंभिक व्यवहारात e07साडेचार टक्क्य़ांनी उसळून प्रति पिंप ५८.९४ डॉलरच्या घरात गेले.
****
प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत उत्तरोत्तर सशक्त बनत असलेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी उत्पादनांची जागतिक व्यापारात घटत असलेली मागणीबाबत नकारात्मकता दर्शवीत अमेरिकेतील शेअर निर्देशांकांनी बुधवारच्या मोठय़ा आपटीचाही आशियाई व भारताच्या भांडवली बाजारात प्रतिकूल पडसाद उमटले.
****
स्थानिक बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन्स व्यवहारांच्या मार्च मालिकेचा समाप्तीचा दिवसही गुरुवारीच असल्याने, या बाजारातील सहभागींनी एप्रिल महिन्यातील मालिकेसाठी सौदे सुरू ठेवण्याऐवजी त्यापासून हात मोकळे करून घेण्याचा पवित्रा घेतला. त्याचेही बाजारातील नकारात्मकतेत भर घालणारे परिणाम दिसून आले.
****
स्थानिक बाजारावर दबदबा असलेल्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांमधील घबराटीचे सावटही निर्देशांकाच्या गुरुवारच्या मोठय़ा घसरणीवर दिसून आले. विदेशी गुंतवणुकीची सर्वाधिक मात्रा असलेल्या एचडीएफसी, इन्फोसिस हे घसरणीत अग्रेसर असलेले समभाग होते. निर्देशांकातही हेच समभाग सर्वात भारमान असल्याने त्यांचे एकूण घसरणीतही मोठे योगदान राहिले.
****
प्रमुख आशियाई बाजारात हाँगकाँगच्या हँगसेंग निर्देशांक ०.१३ टक्के, तर जपानचा निक्केई निर्देशांक सर्वाधिक १.३९ टक्क्य़ांनी डचमळला.