मुंबई भांडवली बाजारातील निर्देशांक सलग पाचव्या दिवशीही घसरला. सोमवारी १७ अंकांनी घसरण होत अखेर तो २५००६.९८ अंकांवर स्थिरावला. ग्राहकोपयोगी वस्तू आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या समभागात मोठी घसरण झाली. तर निफ्टी ७४५४.१५ वर स्थिरावला.
गेल्या शुक्रवारी परदेशी पोर्टफोलिओ असलेल्या गुंतवणूकदारांनी एकूण ७२३.४८ कोटींची विक्री केली होती, असे स्टॉक एक्स्चेंजमधील आकडेवारीत दिसून आले. त्याआधी सलग सहा सत्रांमध्ये याच गुंतवणूकदारांकडून खरेदी झाल्यामुळेच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जून महिन्यात उसळला होता.
अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केलेल्या उपाययोजना गुंतवणूकदारांना फारशा आकर्षित करू शकल्या नाहीत. मे २०१४ च्या ६.०१ टक्क्यांच्या तुलनेत महागाईचा निर्देशांक ३० जून २०१४ अखेर ५.४३ टक्क्यांपर्यंत घसरला. शुक्रवारी बाजारातील उलाढाली बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यातील कारखान्यामधील उत्पन्नाने गेल्या १९ महिन्यांतील उच्चांक गाठला आणि ४.७ टक्क्यांवर झेप घेतल्याचे निष्पन्न झाले होते.

या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स २५०९३.१६ वर सुरू झाला आणि काही वेळातच २५०९५.७६ वर पोहोचला. मात्र काही निवडक स्टॉक्समधील नफेखोरीने अल्पावधीतच त्याची २४८९२ पर्यंत घसरण झाली. अखेर शुक्रवारच्या तुलनेत ०.०७ टक्क्यांची घसरण होत बाजार बंद होताना हा निर्देशांक २५०२४.३५ वर स्थिरावला.
केंद्र सरकारने दंडात्मक कारवाईचा आदेश दिल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांत ०.५३ टक्क्यांची घसरण झाली. हिंदुस्तान युनिलीव्हर लिमिटेड, आयसीआयसीआय, एचडीएफसी यांच्या समभागात घसरण झाली. तर हिंडाल्को, टाटा पॉवर, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि अॅक्सिस बँकेच्या समभागांचा भाव वधारला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सूचकांकातही ०.०७ टक्क्यांनी घसरण झाली आणि निफ्टी ७४५४.१५ वर स्थिरावला.

डॉलरच्या तुलनेत रुपया १४ पैशांनी घसरला
डॉलरला असलेल्या मागणीत वाढ झाल्यामुळे रुपयाचे सोमवारी अवमूल्यन झाले. त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ६०.०७ पर्यंत घसरला. परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली समभाग विक्री, बँक आणि खरेदीदारांकडून डॉलरची वाढलेली मागणी आणि स्थानिक कंपन्यांचे घसरलेले समभाग यांचा फटका रुपयाला बसला. शुक्रवारी संध्याकाळी प्रति डॉलर रुपयाचे मूल्य ५९.९३ इतके होते. सोमवारी प्रारंभी त्यात अल्पशी घसरण होत ते ५९.९५ इतके झाले. उत्तरार्धात आणखी घसरण होत रुपया ६०.२०५० पर्यंत खाली आला. मात्र शेवटी थोडासा सावरल्याने ०.२३ टक्क्यांनी अवमूल्यन होत ६०.०७ वर स्थिरावला. शुक्रवारच्या तुलनेत रुपयाने १४ पैशांची घसरण दर्शवली. तेल कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाला त्याचा फटका बसला असे निरीक्षण एका अर्थतज्ज्ञाने नोंदवले. रिझर्व्ह बँकेने प्रति डॉलर रुपयाचे मूल्य ६०.००५ तर प्रति युरो रुपयाचा भाव ८१.५९९ असा निश्चित केला. पौंडाच्या तुलनेत रुपयाचा भाव १०२.८० होता. तर १०० येनसाठी रुपयाचे मूल्य ५९.१९ इतके राहिले.