जुलैमधील घाऊक महागाई दराने सलग सातव्या महिन्यात उणे स्थितीतील प्रवास नोंदविल्याच्या जोरावर उंचावलेल्या व्याजदर कपातीच्या आशेचे स्फुरण चढलेल्या गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सप्ताहअखेरच्या व्यवहारात अधिक खरेदीचा सपाटा लावला. परिणामी मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकाने गेल्या सात महिन्यांतील सर्वोत्तम निर्देशांक उसळी शुक्रवारच्या एकाच सत्रात नोंदविली. यामुळे सेन्सेक्सला २८ हजार, तर निफ्टीला ८५००चा पल्ला पार करणे विनासायास शक्य झाले.
५१७.७८ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,०६७.३१ वर, तर १६२.७० अंश वाढीसह निफ्टी ८५१८.५५ वर बंद झाला. प्रमुख निर्देशांकाची ही एकाच सत्रातील जानेवारी २०१५ नंतरची सर्वात मोठी झेप ठरली. त्यातही सेन्सेक्स २० जानेवारीनंतर, तर निफ्टी १५ जानेवारीनंतर प्रथमच या स्तरावर उंचावला. सप्ताहअखेरच्या व्यवहारात निफ्टी ८५३०.१० तर सेन्सेक्स २८,१००.६४ पर्यंत झेपावला. गुरुवारच्या तुलनेत दोन्ही निर्देशांक जवळपास दोन टक्क्य़ांनी उंचावले.
संसदेतील वस्तू व सेवा कर तसेच भूसंपादन विधेयकाच्या रूपात आर्थिक सुधारणा रखडल्याच्या पाश्र्वभूमीवर तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया ६५ पर्यंत तळात गेल्यावर भांडवली बाजारात गेल्या काही सलग सत्रांपासून घसरणीचे वातावरण होते. शुक्रवारी मात्र जुलैमधील उणे (-) ४.०५ टक्क्य़ांवर विसावलेल्या घाऊक महागाईच्या दराचे आकडे जाहीर होताच बाजारात चैतन्य पसरले. महागाई कमी होत असलेली पाहून आता व्याजदर कमी होतील या आशेवर बाजारात अधिकतर खरेदीचे व्यवहार झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी गेल्या साडेसहा महिन्यातील उतार अनुभवल्याची जोडही बाजाराच्या तेजीत इंधन घालणारी ठरली. व्याजदर कपातीच्या आशेने तसेच सरकारकडून सहाय्य होण्याच्या अंदाजाने बँक क्षेत्रातील समभागांमध्ये अधिक मूल्य चमक शुक्रवारच्या व्यवहारात दिसली. बँक समभागांसह वेदांता, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो, भारती एअरटेल हे सेन्सेक्समधील आघाडीचे समभाग तेजीत राहिले.
सेन्सेक्समधील केवळ दोन समभागवगळता इतर सर्व मूल्य वाढ नोंदविणारे ठरले. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँकेसह आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक या खासगी बँकांचे समभाग मूल्यही वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही व्याजदर निगडित – स्थावर मालमत्ता, बँक, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही २ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

निर्यात गडगडली; सलग आठव्या महिन्यांत
नवी दिल्ली: भारताच्या अर्थस्थितीत सुधाराचे विविधांगी पैलूंद्वारे संकेत मिळत असले, तरी देशातून होणाऱ्या सेवा व उत्पादनांच्या निर्यातीला घरघर लागली असल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीने पुन्हा एकदा सिद्ध केली. निर्यातीने सलग आठव्या महिन्यांत घसरणीचा क्रम सुरू ठेवत ती जुलै महिन्यांत वर्षांगणिक १०.३ टक्क्य़ांनी घसरल्याचे आढळले आहे. परिणामी परराष्ट्र व्यापारातील तूट जुलैमध्ये १२.८ अब्ज डॉलर इतकी विस्तारली आहे. जूनमध्ये या तुटीचे प्रमाण १०.८ अब्ज डॉलर असे होते, असे वाणिज्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारी दर्शविते. दिलासा देणारी बाब म्हणजे आयाततही जुलैमध्ये १०.३ टक्क्य़ांनी घट झाली.

कच्च्या तेलाचा साडेसहा वर्षांचा तळ
लंडन: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी शुक्रवारी  साडेसहा वर्षांंचा तळ गाठला. लंडनच्या बाजारात सप्ताहअखेर ब्रेन्ट क्रूड तेल प्रति पिंप ४५.२० डॉलरवर आले आहेत. मार्च २००९ नंतरची ही सर्वात कमी किंमत आहे. व्यवहारासाठी सप्टेंबरमधील तेल मागणी नोंदविण्याचा शुक्रवारचा अखेरचा दिवस होता. तेल दरांमध्ये गुरुवारीही तब्बल ३ टक्क्य़ांपर्यंतची घसरण नोंदली गेली होती. चिनी अर्थव्यवस्थेची चिंता तसेच तेलाचा अतिरिक्त पुरवठा यामुळे तेल दर कमी होत असल्याचे सांगितले जाते.