गुंतवणूकदारांच्या नफेखोरीने बुधवारी मुंबई शेअर बाजाराला एकाच सत्रातील महिन्याभरातील सर्वात मोठी आपटी नोंदविण्यास भाग पाडले. २०७.९१ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,०५७.४१ वर, तर ५८.८५ अंश नुकसानासह निफ्टी ८,०९४.१० वर येऊन ठेपला. व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने ६१ चा स्तर गाठण्यानेही भांडवली बाजारात चिंता निर्माण केली. चलनही बुधवारी महिन्यातील तळात रुतले होते.
सोमवारी ऐतिहासिक उच्चांक गाठणाऱ्या भांडवली बाजारात नफेखोरीसाठी गुंतवणूकदारांनी सलग दोन व्यवहारांत विक्रीचा मारा केला. परिणामी ८ ऑगस्टनंतर सेन्सेक्सने एकाच व्यवहारातील सर्वात मोठी घसरण मंगळवारी नोंदविली. एकाच व्यवहारातील यापूर्वीची मोठी घसरण २५९.८७ अंश होती.
मुंबई निर्देशांक व्यवहारात २७,०१८.११ पर्यंत घसरला होता. याचबरोबर निफ्टीनेही मंगळवारी ८,१०० चा स्तर सोडला. मुंबई शेअर बाजारात १.५६ टक्क्यांसह ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वाधिक फरकाने आपटला. त्या उलट मिड व स्मॉल कॅपमधील वाढ बुधवारीही कायम राहिली. सेन्सेक्समधील रिलायन्स, इन्फोसिस, आयटीसी, हीरो मोटो, कोल इंडिया, एचडीएफसी समभागांमध्ये घसरण दिसली.