प्रमुख निर्देशांकांतील घसरण बुधवारी सलग सहाव्या सत्रांतही कायम राहिली. यामुळे मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजार गेल्या दहा आठवडय़ांच्या नीचांक स्तरावर येऊन ठेपला.
मार्चमधील वायदापूर्तीची अखेरपूर्वीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४९.८९ अंश घसरणीसह २८,१११.८३ वर तर निफ्टी १२.१५ अंश नुकसानास ८,५३०.८० वर येऊन ठेपला.
गेल्या सहा व्यवहारांतील मिळून सेन्सेक्सची उतरंड ही २.१७ टक्के, ६२४.५५ अंश राहिली आहे. त्यामुळे मुंबई निर्देशांक आता १५ जानेवारीच्या २८,०७५.५५ वर नोंदला गेला आहे.e06मंगळवारप्रमाणेच बाजारात बुधवारीही व्यवहार चित्र सारखेच राहिले. सुरुवातीच्या निर्देशांक वाढीनंतर सेन्सेक्स २८,२४९.६० पर्यंत उंचावला, तर त्याचा दिवसाचा नीचांक थेट २८,०३१.४२ राहिला.
सेन्सेक्समधील लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, स्टेट बँक, टीसीएस, एनटीपीसी, ओएनजीसी, गेल, कोल इंडिया, टाटा स्टील, भेल, टाटा पॉवर यांचे समभाग घसरले. तर आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, सन फार्मा, विप्रो, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, सेसा स्टरलाइट यांना मागणी राहिली.
किरकोळ गुंतवणूकदारांकडून स्मॉल व मिड कॅपमध्येही विक्री झाली. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण एनटीपीसीच्या समभाग मूल्यांमध्ये, ३.५१ टक्क्यांपर्यंत झाली. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू सर्वाधिक, १.६५ टक्क्यांसह आपटला.
आशियाई बाजारात संमिश्र वातावरण राहिले. हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियाचे प्रमुख निर्देशांक उंचावले होते; तर चीन आणि तैवानमधील निर्देशांकांमध्ये किरकोळ घसरण नोंदली गेली. युरोपातील कॅक, डॅक्समध्ये ०.४ टक्के नुकसान नोंदले गेले.

रुपयातील तेजी निमाली
गेल्या सलग सात व्यवहारांत भक्कम होत असलेला रुपया बुधवारी डॉलरच्या तुलनेत कमकुवत बनला. अमेरिकी चलनासमोर ७ पैशांनी घसरत रुपया ६२.३३ वर येऊन विसावला. सातही व्यवहारांतील रुपयातील वाढ ७१ पैशांची होती. जून २०११ नंतर रुपयाने तेजीचा असा दीर्घ प्रवास मंगळवापर्यंत राखला. बुधवारी मात्र महिनाअखेरच्या बँक तसेच आयातदारांकडून डॉलरच्या मागणीने रुपया घसरणीकडे झुकल्याचे मानले जाते.