आर्थिक प्रगतीत सिंहाचा वाटा राखणाऱ्या भारतीय बँकिंग क्षेत्रातील ताज्या घडामोडींचे भांडवली बाजारानेदेखील सप्ताहअखेर नव्या उच्चांकासह स्वागत केले. आठवडय़ातील शेवटच्या सत्रात महिन्यातील उत्तम कामगिरी बजावत सेन्सेक्स थेट २८,३५० नजीक पोहोचला. तर निफ्टीही ८,४७५ पर्यंत गेला.
सेन्सेक्स शुक्रवारअखेर २६७.०७ अंश वाढीने २८,३३४.६३ तर निफ्टी ७५.४५ अंश वधारणेने ८,४७७.३५ वर e07विराजमान झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहारंभीचा सार्वकालिक स्तर यामुळे तोडला. तर एकाच सत्रातील सर्वात मोठी निर्देशांक उडी मुंबई निर्देशांकाने यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी ५१९.५० अंशांची घेतली होती.
सेन्सेक्सचा यापूर्वीचा २८,२९४.०१ हा व्यवहारातील उच्चांक १९ नोव्हेंबर तर सत्रअखेरचा सर्वोच्च टप्पा १७ नोव्हेंबर रोजी २८,१७७.८८ होता. तर निफ्टीने शुक्रवारी व्यवहारात ८,४८९.८० ला स्पर्श केल्यानंतर ८,४७७.३५ हा सर्वोच्च टप्पा राखला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा १९ नोव्हेंबरचा ८,४५५.६५ हा व्यवहारातील उच्चांकी टप्पा तर बंदअखेरचा १७ नोव्हेंबरचा ८,४३०.७५ हा स्तर शुक्रवारी मागे टाकला गेला.
गुरुवारच्या भांडवली बाजारातील व्यवहार समाप्तीनंतर कोटक महिंद्रद्वारे आयएनजी वैश्य ही अन्य खासगी बँक ताब्यात घेण्याची घोषणा झाली. याबाबतच्या केवळ चर्चेमुळेच गुरुवारच्या व्यवहारात सूचिबद्ध दोन्ही कंपन्यांचे समभाग वर्षांच्या उच्चांकाला पोहोचले होते.
तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या ताबा – विलीनीकरणाच्या या प्रक्रियेचे शुक्रवारी बाजारात सुरुवातीपासूनच स्वागत होताना दिसत होते. जवळपास २०० अंशांच्या वाढीने सेन्सेक्स यावेळी २८,२५० पुढे गेला होता. तर निफ्टी यावेळी ८,४६० पर्यंत गेला होता. सेन्सेक्सने व्यवहारात २८,३६०.६६ पर्यंत झेप घेतली.
बँकिंग क्षेत्रासह भांडवली वस्तू, ग्राहकपयोगी वस्तू, तेल व वायू, वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा निर्देशांकांनीही भांडवली बाजाराला उच्चांकापर्यंत नेण्यास सहाय्य केले. तर बँक समभागां व्यतिरिक्त रिलायन्स, हिंदाल्को, सिप्ला, भेल, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एल अॅण्ड टी या समभागांच्या मूल्य वाढीनेही सेन्सेक्समध्ये एकाच दिवशी मोठी झेप नोंदली गेली. सेन्सेक्समधील तब्बल २४ समभाग तेजीच्या यादीत स्थिरावले.
रुपयाही सावरला..
६२ च्या खाली गेलेल्या डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे १८ पैशांनी सावरणेही बाजारात उत्साह आणणारे ठरले. तर येत्या आठवडय़ापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक सुधारणांबाबतचे अधिक निर्णय घेतले जाण्याच्या आशेवरही निर्देशांक झुलला. तर मालवाहतुकीसाठी नव्या वाघिणींच्या (व्हॅगन) नोंदणीची घोषणा होण्याच्या सरकारच्या संभाव्य निर्णयावर या क्षेत्रातील समभागही २० टक्क्य़ांपर्यंत उंचावले.
बँक समभागांची चलती
मुंबई : कोटक महिंद्र-आयएनजी वैश्य बँकेच्या विलीनीकरणाने शेअर बाजारात शुक्रवारी एकूणच बँकांच्या समभागांचा भाव कमालीचा वधारला. एकूण बँक निर्देशांकदेखील ४ टक्क्यांनी वधारला, तर आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक व अॅक्सिस बँक यांनी ‘सेन्सेक्स’च्या वाढीत १५० अंशांचे योगदान  दिले. सेन्सेक्सच्या उत्तुंग झेपेचा प्रमुख दावेदार कोटक महिंद्र ३.७ टक्क्यांनी झेपावला; तर आयएनजी वैश्य मात्र सत्रात व्यवहारात दोन टक्क्यांपर्यंत वाढून अखेर गुरुवारच्या तुलनेत ८१४.२० रुपयांवर स्थिर राहिला. ४ टक्क्यांपर्यंत विदेशी संस्थागत गुंतवणूक विस्तारण्यास रिझव्र्ह बँकेच्या मिळालेल्या परवानगीने येस बँकेचा समभागही शुक्रवारी ४.०१ टक्क्यांनी वधारला. समभाग विभाजनापोटी आयसीआयसीआय बँकेचा समभागही २.६ टक्क्यांनी वधारला. बाजारात असे चित्र असतानाच सिटी युनियन बँक, डीसीबी, धनलक्ष्मी, फेडरल, कर्नाटक बँक या मालमत्तेत छोटय़ा असलेल्या बँकांनीही २ ते ५ टक्के वाढ दाखवली.