सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविताना सेन्सेक्स सप्ताहारंभीच २६ हजारांखाली आला आहे. तर निफ्टीही शुक्रवारप्रमाणेच घसरणीचाच क्रम राखत ७,७५०च्या खाली आला. सेन्सेक्स सोमवारी १३५.५२ अंश घसणीसह २५,९९१.२३ पर्यंत येऊन ठेपला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४१.७५ अंश घसरणीने ७,७४८.७० वर आला. गुंतवणूकदारांच्या नफेखोरीच्या धोरणामुळे भांडवली बाजार आता सप्ताहाच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे.
सलग आठ व्यवहारांत तेजी नोंदवीत मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराने निर्देशांकांचा सर्वोच्च टप्पा गाठला होता. तर अनेक महिन्यांनंतरची सलगची वाढ या वेळी राखली गेली होती. गेल्या सप्ताहाअखेर मात्र या तेजीला घसरणीच्या रुपाने खीळ बसली. शुक्रवारी किरकोळ घसरणीसह दोन्ही प्रमुख भांडवली बाजार नकारात्मक विसावले. नव्या सप्ताहारंभीदेखील हाच कित्ता गिरविला गेला. आघाडीच्या कंपन्यांच्या फायद्यातील निकालांच्या जोरावर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनीही खरेदीचा जोर गेल्या आठवडय़ात लावला होता.
नव्या आठवडय़ातील व्यवहाराला प्रारंभ करताना सेन्सेक्स तेजीत होता. याच वेळी तो २६,१८१.८३ पर्यंत गेला. यानंतर मात्र तो घसरू लागला. त्याच वेळी त्याने २६ हजाराची पातळीही सोडली. त्याने २५,९०० हा दिवसाचा नीचांकही नोंदविली. दिवसअखेर सेन्सेक्स २६ हजाराखालीच स्थिरावला. २१ जुलैच्या २५,७१५.१७ नंतरचा हा मुंबई शेअर बाजाराचा हा तळ होता. सलग आठ सत्रात ५ टक्क्यांची वाढ राखणाऱ्या सेन्सेक्समध्ये गेल्या आठवडय़ात शुक्रवारी १४५ अंशांची घसरण झाली होती.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी सोमवारच्या व्यवहारादरम्यान वधारलेल्या दरांवर पोलाद, तेल व वायू, बांधकाम क्षेत्रातील समभागांची विक्री करत फायदा कमाविला. सार्वजनिक कंपन्या, वाहन, बँक, भांडवली वस्तू या क्षेत्रातील समभागांचेही मूल्य रोडावले. तिमाही वित्तीय निष्कर्षांचा दिवस असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग मात्र ३.६ टक्क्यांनी वधारला. तर कोल इंडियाने सर्वाधिक ३.१४ टक्क्यांचे नुकसान सोसले.
सेन्सेक्समधील २१ समभाग घसरले. त्यात हिंदाल्को, टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स, ओएनजीसी, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, सिप्ला यांचा क्रम राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरणीत २.६९ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक आघाडीवर राहिला. मुंबई शेअर बाजारातील उलाढाल शुक्रवारच्या तुलनेतही कमी २,४६२.८८ कोटी रुपयांची राहिली.
रुपया आठवडय़ाच्या नीचांकावर
मुंबई: डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन सप्ताहारंभीच आठवडय़ाच्या तळात येऊन विसावले. अमेरिकी चलनापुढे ३ पैशांनी कमकुवत होत रुपया ६०.१३ पर्यंत घसरला. नव्या सप्ताहाची सुरुवात करताना रुपया ६०.१२ या घसरत्या क्रमावरच होता. गेल्या आठवडय़ाची अखेर करताना रुपया शुक्रवारी ६०.१० वर बंद झाला होता. सोमवारच्या व्यवहारात रुपया ६०.१६ पर्यंत घसरल्यानंतर मध्यंतरात ६०.०८ पर्यंत उंचावला. अखेर मात्र त्याची शुक्रवारच्या तुलनेत ०.०५ टक्क्यांची घसरणच झाली. रुपयाचा सोमवारचा बंद स्तर हा २२ जुलैच्या ६०.२४ नंतरचा सर्वात किमान स्तर राहिला. सलग तिसऱ्या व्यवहारात स्थानिक चलन कमकुवत बनले आहे. ही घसरण एकूण ८ पैशांची राहिली आहे.