सप्ताहाच्या अखेरीस भांडवली बाजाराने त्यांचे महत्त्वाचे टप्पे पुन्हा पादाक्रांत करण्यात यश मिळविले. सलग तीन व्यवहारांतील घसरण मोडून काढताना सेन्सेक्स २७ हजारांवर, तर निफ्टी ८,१०० वर पोहोचला.
सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन व महागाई दरांपूर्वी गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी करीत सेन्सेक्समध्ये ६५.१७ अंश, तर निफ्टीने १९.८० भर घातली. दोन्हीही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे २७,०६१.०४ व ८,१०५.५० अशा भावनिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळ्यांपल्याड बंद झाले.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने गेल्या तीन व्यवहारांत ३२३.९८ अंश आपटी नोंदविली होती. यामुळे मुंबई निर्देशांक २७ हजारांच्याही खाली आला होता. तर तीन व्यवहारांतील ८८ अंश घसरणीमुळे निफ्टीनेही त्याची ८,१००ची पातळी सोडली होती. साप्ताहिक तुलनेत मात्र दोन्ही निर्देशांक पाचव्यांदा वधारले आहेत.
सप्ताहअखेरच्या व्यवहारात औषधनिर्माण, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली, तर ऊर्जा, भांडवली वस्तू, बांधकाम, पोलाद समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा अवलंब केला.