आठवडय़ाच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या नव्या विक्रमाची शिदोरी सप्ताहअखेर गाठीशी बांधत भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचा ‘विकेण्ड’ प्रवास अखेर सुरू झाला. आधीचा विक्रम एकाच सत्रात मागे टाकण्याचा प्रमुख निर्देशांकाचा कित्ता शुक्रवारअखेरही कायम राहिला. गेल्या सात व्यवहारांपासून तेजीवर आरुढ झालेले प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या अनोख्या टप्प्याच्याही पुढे गेले आहेत. शुक्रवारनंतर सेन्सेक्स २९,३०० नजीक तर निफ्टी ८,८५० च्या पुढे गेला आहे. सलग चौथ्या सत्रात निर्देशांकांनी त्यांचा आधीचा विक्रम मोडित काढला आहे.
२९,२७८.८४ या सर्वोच्च टप्प्याला गवसणी घालत मुंंबई निर्देशांकाने शुक्रवारी २७२.८२ अंश भर नोंदविली. तर इतिहासात प्रथमच ८,८०० पार करणारा निफ्टी आठवडय़ातील शेवटच्या सत्रात ७४.२० अंश वाढीसह ८,६६६.४० वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजाराची गेल्या सलग सात व्यवहारातील निर्देशांक अंश वाढ एकूण १,९३२.०२ राहिली आहे.
युरोपीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी येत्या दीड वर्षांपर्यंत आर्थिक बळ देण्याचा युरोपीय मध्यवर्ती बँकेचा निर्णय गुरुवारी उशिरा जाहिर झाला. त्याचे अपेक्षित सकारात्मक परिणाम शुक्रवारच्या व्यवहारात होणे अपेक्षितच होते. सुरुवातीपासून तेजी नोंदवित सेन्सेक्स सत्रात थेट २९,४०८.७३ पर्यंत पोहोचला. तर निफ्टीचीही व्यवहारातील उच्चांकी प्रवास ८,८६६.४० वर गेला. दोन्ही निर्देशांकानी त्यांचे यापूर्वीचे व्यवहारातील तसेच बंदअखेरचे विक्रम शुक्रवारी मागे टाकले.
सेन्सेक्समधील टाटा पॉवर, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, सिप्ला, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, एचडीएफसी बँक, सेसा स्टरलाईट, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एनटीपीसी, विप्रो, हीरो मोटोकॉर्प, स्टेट बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रिज असे सारेच मूल्य उंचावणाऱ्या समभागांच्या यादीत होते.e05किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रामुख्याने व्यवहार होणाऱ्या स्मॉल व मिड कॅप निर्देशांकांमध्ये मात्र अनुक्रमे ०.७३ व ०.१४ टक्के घसरण नोंदली गेली. मुंंबई शेअर बाजारातील एकूण उलाढालही गुरुवारच्या तुलनेत वाढून ती ४,०३२.२५ कोटी रुपये झाली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही पायाभूत निर्देशांक सर्वाधिक १.५१ टक्क्य़ांसह वाढला. पाठोपाठ वाहन, स्थावर मालमत्ता, भांडवली वस्तू, ऊर्जा, पोदाल, बँक, आरोग्यनिगा, माहिती तंत्रज्ञान हेही उंचावणाऱ्या निर्देशांकांमध्ये समाविष्ट झाले. प्रमुख निर्देशांकांनी गेल्या आठ महिन्यातील सर्वोत्तम सप्ताह झेप यंदा राखली आहे.
गणराज्य दिनानिमित्त बाजारात सोमवारी व्यवहार होणार नाहीत.
भारतीय भांडवली बाजाराला मिळालेले हे एक प्रकारचे वित्तीय पाठबळच म्हणता येईल. भारतासारख्या विकसनशील देशांत समभागांतील गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात निधी ओघ सुरू झाला आहे.
– राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलियो.
भांडवली बाजारात तर तेजी आहेच. मात्र रिझव्‍‌र्ह बँकेची भविष्यातील व्याजदर कपात आणि सरकारच्या आर्थिक सुधारणा याचा परिणामही यात अधिक भर घालतील. एकूणच अर्थवातावरणात भर पडत आहे.
दिपेन शाह, समूह संशोधन प्रमुख, कोटक सिक्युरिटीज.

विक्रमांचा पाठलाग..
शुक्रवार
सेन्सेक्स : २९,२७८.८४ (+२७२.८२)
निफ्टी : ८,८३५.६० (+७४.२०)
गुरुवार
सेन्सेक्स : २९,००६.०२ (+११७.१६)
निफ्टी : ८,७६१.४० (+३१.९०)
बुधवार
सेन्सेक्स : २८,८८८.८६ (+१०४.१९)
निफ्टी : ८,७२९.५० (+३३.९०)
मंगळवार
सेन्सेक्स : २८,७८४.६७ (+५२२.६६)
निफ्टी : ८,६९५.६० (+१४४.९०)

चांदी ४०,५०० वर
पांढऱ्या धातूच्या दरातील चमक शुक्रवारी किलोला ४०,५०० रुपयांपुढे गेली. शहरात चांदीचा भाव एकाच व्यवहारात २३५ रुपयांनी उंचावल्याने दर ४०,५०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. तर सोन्यातील दरवाढही कायम आहे. स्टॅण्डर्ड व शुद्ध प्रकारचे सोने तोळ्यासाठी शुक्रवारी ८० रुपयांनी वाढून २८ हजार रुपयांपुढे, अनुक्रमे २८,०५० व २८,२०० रुपयांवर गेले.

रुपया भक्कम
आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा भक्कम बनला. अमेरिकी चलनापुढे तो शुक्रवारी २८ पैशांनी उंचावत ६१.४२ वर पोहोचला. सप्ताहअखेरच्या सत्राची चलनाची सुरुवात ६१.४५ या वाढीसह झाली. सत्रात तो ६१.३६ पर्यंत उंचावला. आधीच्या सत्रात रुपयाने नरमाई नोंदविली गेली होती. या सप्ताहात चलनाचा प्रवास संमिश्र राहिला आहे.