हवाई परवान्याची मुदत संपण्यास अवघा आठवडा शिल्लक असताना किंगफिशर एअरलाईन्सने सोमवारी नागरी हवाई महासंचालनालय अर्थात ‘डीजीसीए’कडे नव्याने व्यवसाय आराखडा सादर केला. संपकरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतल्यानंतरही परवाना स्थगित असल्याने या कंपनीची हवाई उड्डाणे गेल्या तीन महिन्यांपासून स्थगित आहेत.
किंगफिशर एअरलाईन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनी कंपनीची हवाई सेवा पुन्हा सुरू होण्याच्या उद्देशाने नवा व्यवसाय आराखडा नागरी हवाई महासंचालनालयाकडे सोमवारी सादर केला आहे. यात कंपनीकडून करण्यात आलेल्या आर्थिक तरतूदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कंपनीला येत्या दीड महिन्यात पुन्हा विमानसेवा सुरू करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
नव्याने सादर करण्यात आलेल्या व्यवसाय तसेच आर्थिक तरतुदीची कोणतीही माहिती कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र ३१ डिसेंबरपूर्वी यावर ‘डीजीसीए’कडून नक्कीच सहानुभूतीने विचार होईल आणि येत्या सहा आठवडय़ात पुन्हा विमान सेवा सुरू होईल, असे कंपनीकडून अधिकृतरीत्या सांगण्यात आले.