‘स्वप्नपूर्ती’ योजनेच्या दीड लाख अर्जाचे ‘टीजेएसबी’कडून वितरण
ठाणे: अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ३१५४ सदनिकांच्या विक्रीच्या सिडकोच्या ‘स्वप्नपूर्ती गृहनिर्माण’ योजनेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘टीजेएसबी’ने मंगळवापर्यंत तब्बल १ लाख ४२ हजार अर्जाचे वितरण केले आहे. अर्ज उपलब्ध होण्याची शुक्रवार १९ सप्टेंबर ही अंतिम मुदत असल्याने शेवटच्या दोन दिवसांत अर्ज मिळविण्यासाठी टीजेएसबीच्या बहुतांश शाखांसमोर घरइच्छुकांच्या मोठय़ा रांगा लागल्याचे चित्र आहे. या योजनेच्या अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण व्यवस्थापन टीजेएसबीकडून केले जात असून, अशा प्रकारे शासकीय योजनेचे व्यवस्थापन सोपविण्यात आलेली ही सहकार क्षेत्रातील पहिलीच बँक आहे. स्वप्नपूर्ती योजनेत पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी टीजेएसबीने विशेष गृहकर्ज योजनाही प्रस्तुत केली आहे.
कॅनरा एचएसबीसी ओरिएंटल बँक लाइफ इन्शुरन्सकडून ‘चॉइसनेट’ दाखल
मुंबई: कॅनरा एचएसबीसी ओरिंएटल बँक ऑफ कॉमर्स लाइफ इन्शुरन्सने आपल्या ‘चॉइसनेट’ या पोर्टलचे बुधवारी अनावरण केले. कंपनीतील तीन भागीदार बँकांच्या इंट्रानेटशी जोडले गेलेले हे पोर्टल तिच्या बँकअॅश्युरन्स सुविधेला बळकटी देणारे ठरणार आहे. यातून तिन्ही बँकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी संपर्कात येणाऱ्या ग्राहकांना कंपनी आयुर्विमा योजनांबाबत अद्ययावत माहिती विनाविलंब पुरविता येणार आहे.
शिवाय तिन्ही बँकांच्या इंटरनेट हाताळू शकणाऱ्या ग्राहकांना अनेक ऑनलाइन सुविधांचा लाभ मिळेल. या खासगी विमा कंपनीच्या योजनांची विक्री या तीन बँकांच्या माध्यमातूनच होत असल्याने या पोर्टलच्या रूपाने झालेल्या एकात्मिकरणातून यंत्रणा व प्रक्रियेवर खर्चातील बचतीचा लाभ अंतिमत: विमाधारकांनाच मिळेल, असे या प्रसंगी बोलताना कंपनीचे मुख्याधिकारी जॉन होल्डन यांनी सांगितले.
‘डीएचएफएल’चा आणखी १४ ठिकाणी विस्तार
मुंबई : डीएचएफएल या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा खासगी गृहवित्त कंपनीने महाराष्ट्रात छोटय़ा शहरांत विस्ताराचे धोरण अनुसरताना, उलवे, नायगाव, डहाणू, रोहा, उल्हासनगर, खोपोली, वाडा, भिवंडी, पेण, मालेगाव, वर्धा, धुळे, नांदेड व महाड या भागांत नऊ शाखा व पाच सेवा केंद्रे सुरू केली आहेत. या नव्या विस्तारामुळे कंपनीचे महाराष्ट्रातील या बाजारपेठेतील अस्तित्व अधिक फैलावले असून अल्प व मध्यम उत्पन्न गटातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत विविध प्रकारच्या गृहकर्ज योजना पोहोचविता येणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्या कंपनी देशभरातील ५५० ठिकाणी कार्यरत असून संयुक्त अरब अमिरातीत दुबई व ब्रिटनमधील लंडन येथे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी कार्यालये चालविते. कंपनीने मार्च २०१४ पर्यंत ४४८ अब्ज उलाढाल नोंदविली आहे.
कॅननचे मुंबईत दहावे दालन
मुंबई : डिजिटल इमेजिंगमध्ये आघाडीवर असलेल्या कॅननने मुंबईमधील १०व्या कॅनन इमेज स्क्वेअर (सीआयएस)ची सुरुवात केली आहे. यामुळे आता कंपनीच्या देशभरातील ५९ शहरांतील कॅनन इमेज स्क्वेअर (सीआयएस) ची संख्या ११४ पर्यंत पोहोचली असून डिसेंबर २०१४ पर्यंत १५० दालने सुरू करण्याचा कॅनन इंडियाची योजना आहे. कंपनीच्या वांद्रे येथील वॉटरफिल्ड रोडवरील नवीन कॅनन इमेज स्क्वेअरचे उद्घाटन कॅनन इंडियाचे पश्चिम विभागातील व्यवसायप्रमुख विकेश रामचंदानी यांच्या हस्ते नुकतेच झाले. डीएसएलआर कॅमेरा बाजारपेठ ही अंदाजे ३.६ लाख एकक इतकी असेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत रामचंदानी यांनी असून कॅनन इंडियाला आपला बाजारपेठीय हिस्सा परत मिळवायचा आहे, असे यानिमित्ताने सांगितले. कंपनी दरवर्षी १० टक्के प्रमाणात विस्तारत असून २०१४ अखेपर्यंत २,१०० कोटी रुपयांचे व्यावसायिक लक्ष्य पूर्ण केले जाईल.