अ‍ॅरो कोटेड प्रॉडक्ट्स आणि ट्रेस टॅग इंटरनॅशनलचे सामंजस्य
मुंबई: उच्चतम सुरक्षा प्रदान करणाऱ्या कागदांच्या निर्मितीत अग्रेसर अ‍ॅरो कोटेड प्रॉडक्ट्स लि.ने आता या क्षेत्रातील व्यवसायाला आणखी बळकटी देताना, बँक नोट, पासपोर्ट आणि बिगर-न्यायिक स्टॅम्प पेपरसारख्या उच्च सुरक्षेच्या कागदांच्या निर्मितीत विशिष्ट ‘डीएनए टॅग्नंट्स’ या पेटंटप्राप्त तंत्रज्ञानाचा वापर शक्य बनविला आहे. यासाठी ब्रिटनमधील ट्रेस टॅग इंटरनॅशनल लि. या कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे अ‍ॅरो कोटेड प्रॉडक्ट्सने शेअर बाजाराला (बीएसई) आपल्या भागधारकांना उद्देशून सूचित केले आहे. या दोन स्वतंत्र पेटंटेड तंत्रज्ञानांच्या एकत्रीकरणामुळे या महत्त्वाच्या कागदांची नक्कल होण्याची शक्यता शून्यवत होईल आणि या व्यवसायात जोमाने वाटचाल करणे आपल्याला शक्य होईल, असे अ‍ॅरो कोटेड प्रॉडक्ट्सचे मुख्याधिकारी शिल्पन पटेल यांनी सांगितले.
प्रशासनात जनमाध्यमांचा वापर; मुंबईत दोन दिवसांची परिषद
मुंबई: माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे प्रशासन या क्षेत्रातील व्यावसायिकांची जागतिक संघटना ‘आयसीएसएसीए’ने प्रशासन, जोखीम व्यवस्थापन आणि पूर्तता यांना पुढील कक्षेत नेणाऱ्या जनमाध्यमे अर्थात सोशल मीडिया, मोबाइल तंत्रज्ञान, अ‍ॅनालिटिक्स आणि क्लाऊड या तंत्रज्ञानांचा अंगीकार आणि त्या संबंधाने निर्माण झालेली सुरक्षा आव्हाने याबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. ‘जीआरसी २.० एसएमएसी’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद २६ जुलै आणि २७ जुलै २०१४ रोजी पॅलाडियम हॉटेल येथे होत असून, विविध उद्योगांतील तज्ज्ञ आणि व्यावसायिक त्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. या निमित्ताने ‘आयएसएसीए’च्या इंडिया ग्रोथ टास्क फोर्सकडून आयटी प्रशासन व माहिती सुरक्षेची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमधून ‘आयएसएसीए’ पुरस्कार विजेत्यांचीही घोषणा केली जाईल.
सेंट्रल बँकेकडून ‘सेंट विद्यार्थी’ शैक्षणिक कर्ज योजना
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने उच्च शिक्षणासाठी एकूण खर्चाच्या ८५ ते ९५ टक्क्यांपर्यंत खर्चाचा भार उचलणारी ‘सेंट विद्यार्थी’ ही कर्ज योजना जाहीर केली आहे. भारतातील शिक्षणासाठी कमाल १० लाख तर परदेशात शिक्षणासाठी २० लाखांपर्यंतचे कर्ज बँकेने या योजनेंतर्गत देऊ केले आहे. पुरुष विद्यार्थ्यांला बँकेच्या किमान ऋण दराच्या दोन टक्के अधिक व्याजदराने हे कर्ज देण्यात येईल, तर महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती आणि आयआयटी आणि आयआयएम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सेंट विद्यार्थी’ योजनेत व्याजदरात अर्धा टक्क्यांची सवलत देण्यात आली आहे. शिवाय कर्जाची परतफेड विद्यार्थी शिकत असतानाच सुरू केली गेल्यास व्याजदरात आणखी १ टक्का सवलत लागू केली जाईल.
नवीन उत्सर्जन नियमाधीन २००० किलरेस्कर ग्रीन जेनसेट्सची विक्री
मुंबई : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लागू केलेल्या नवीन उत्सर्जन नियम ‘सीपीसीबी २’चे पालन करणाऱ्या जनरेटर संचाच्या विक्रीत किलरेस्कर इंजिन ऑइल्स लि.ने २०००चा आकडाही पार केला असल्याची घोषणा केली आहे. १ जुलै २०१४ पासून या कठोर नियमनाची अंमलबजावणी सुरू झाली असून, ८०० किलोव्ॉट क्षमतेखालील डिझेल जनरेटर संचांना ते लागू करण्यात आले आहेत. या शक्ती मर्यादेत प्रस्तुत करण्यात आलेल्या ‘किलरेस्कर ग्रीन जेनसेट्स’ हे सीपीसीबी-२ उत्सर्जन नियमाचे पालन करतात आणि त्यांची किंमतही आधीच्या तुलनेत केवळ १५ ते २० टक्केच जास्त असल्याचे कंपनीचे वीजनिर्मिती व्यवसाय विभागाचे प्रमुख संजीव निमकर यांनी सांगितले.