व्याजदराबाबत आश्चर्यकारक निर्णय घेण्यासाठी ओळखले जाणाऱ्या डॉ. रघुराम राजन यांच्या बुधवारच्या निर्णयाला तमाम उद्योग क्षेत्राने कौतुकाची थाप दिली आहे. संथ अर्थव्यवस्थेला वाढीव व्याज दरच कारणीभूत असून त्याबाबत रिझव्‍‌र्ह बँक वेळोवेळी कठोर वागली आहे, असा जाहीर प्रसार करणाऱ्या उद्योग, बँक क्षेत्रांतील धुरिणांनी पतधोरणबाह्य़ पावलाला केंद्रीय अर्थसंकल्पाशी जोडले आहे. अर्थसंकल्पात आगामी चित्र आशावादी दिसत आहे तर पतधोरणाच्या माध्यमातून सुलभ रोकडतेचा मार्ग नवआर्थिक वर्षीही अनुसरला जावा, ही अपेक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी कायम ठेवली आहे. अनेकांनी पाव टक्का व्याजदर कपातीचा निर्णय हा अपपेक्षित असे नमूद करताना वर्षभर किमान एक टक्क्याची व्याज दरकपात याच आशेवर अपेक्षित केली आहे. अनेक बँकप्रमुखांनी त्यांचा आधार दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. तर वाहन, स्थावर मालमत्ता, बिगर बँकिंग वित्तसंस्थांनी आता स्वस्त कर्ज उपलब्ध होईल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

विद्यमान स्थितीत व्याजदर कपातीबाबत काय निर्णय घ्यायचा हे लवकरच स्पष्ट केले जाईल. गुणवत्तापूरक वित्तीय धोरणांचा केंद्र सरकारचा मार्ग आणि महागाईबाबत स्पष्टता करणारे आगामी उद्दिष्ट हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या यंदाच्या निर्णयाला कारणीभूत ठरले आहे.
– अरुंधती भट्टाचार्य, अध्यक्ष, स्टेट बँक.

अर्थसंकल्पातील उन्नत तरतुदींनंतर रिझव्‍‌र्ह बँकेचा व्याजदर कपातीचा निर्णय होणे, याबाबत मुळीच आश्चर्य वाटत नाही. वित्तीय आणि पतधोरण यातील मेळ यामार्फत साधला गेला आहे. नव्या एकूण आर्थिक वर्षांत दीड टक्का व्याजदर कपातीला निश्चितच वाव आहे. यामुळे गुंतवणुकीला चालना मिळेल.
– राणा कपूर, व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी, येस बँक.

महागाईबाबतचा रिझव्‍‌र्ह बँकेचा आशावादी दृष्टिकोन कायम असल्याचेच बुधवारच्या व्याजदर कपातीतून सूचित होते. अर्थव्यवस्थेबाबत विकसित होत असलेल्या निर्देशांकांचाही तो एक परिणाम आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील संस्थात्मक सुधारणा आणि धोरण उपाययोजनाही यातून प्रतिबिंबित होतात. शाश्वत विकासासाठी हे महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेला सुधाराच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेचे पाऊल पूरक ठरेल.
– चंदा कोचर, व्यवस्थापकीय संचालिका, मुख्याधिकारी, आयसीआसीआय बँक

पाव टक्का व्याजदर कपातीचा रिझव्‍‌र्ह बँकेचा निर्णय निश्तितच आश्चर्यकारक आहे. वित्तीय धोरणावरील सुसह्य़ता यामार्फत रिझव्‍‌र्ह बँकेनेही अधोरेखित केली आहे. विकासाला चालना देण्याचा प्रयत्न रिझव्‍‌र्ह बँकेने केंद्र सरकारच्या सहकार्याने केला आहे.
– आर. के. गुप्ता, कार्यकारी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र.

पतधोरण पारेषणाचा हा परिणाम आहे. रिझव्‍‌र्ह बँकेची यापूर्वीची पाव टक्का व आताची त्याच प्रमाणातील व्याजदर कपात आता अन्य बँकांनाही त्यांचे आधार दर बदलण्यास बंधनकारक करेल.
– टी. एम. भसीन, अध्यक्ष, इंडियन बँक्स असोसिएशन

रेपो दर कपातीचे रिझव्‍‌र्ह बँकेने अचानक उचललेले पाऊल निश्चितच उत्तम असेच म्हणावे लागेल. रोकड संकटात असलेल्या एकूणच व्यवसाय व उद्योगाला यामुळे दिलासा मिळेल. नजीकच्या भविष्यात मध्यवर्ती बँकेकडून अधिक व्याजदर कपातीची अपेक्षा मात्र कायम आहे.
– ललितकुमार जैन, अध्यक्ष, क्रेडाई

पाव टक्का व्याजदर कपातीच्या गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्या निर्णयाचे स्थावर मालमत्ता क्षेत्र निश्चितच स्वागत करते. या क्षेत्राच्या एकूण व्यवसाय वाढीसह कमी गृहकर्ज व्याजदरामुळे घर खरेदीही वाढण्यास सहकार्य मिळेल. गृहकर्ज व्याजदर ८ टक्क्यांवर येण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत आणखी किमान पाव टक्के दर कपातीची गरज आहे.
– राजेश प्रजापती, व्यवस्थापकीय संचालक, प्रजापती कन्स्ट्रक्शन

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी केलेली रेपो दरकपात ही उद्योगांच्या अपेक्षेनुसारच आहे. गव्हर्नरांनी याद्वारे एक स्वागतार्ह पाऊल पुढे टाकले आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये व्याजदर निश्चितच आणखी कमी होतील. याद्वारे स्थावर मालमत्ता क्षेत्राला पुन्हा एकदा बळ मिळेल.
– श्रीकांत परांजपे, अध्यक्ष, परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन)

व्याजदर कपातीची खूप अपेक्षा स्थावर मालमत्ता क्षेत्राप्रमाणेच सामान्य घर खरेदीदारांचीही होती. अनेकांच्या घर खरेदीचा निर्णय त्यावर अवलंबून असतो. वाढत्या सेवा करामुळे त्यातून थोडासा दिलासा आता मिळेल. महागाईचा दर आगामी कालावधीत स्थिर राहील तसेच विकासकांचा विश्वासही उंचावेल.
– संजय दत्त, कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक (दक्षिण आशिया), कुशमन अ‍ॅण्ड वेकफील्ड.

जानेवारीमध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरणाव्यतिरिक्त केलेल्या पाव टक्का व्याजदर कपातीचा थेट परिणाम गेल्या काही दिवसांत प्रत्यक्षात दिसलाच नाही. मात्र आताची मिळून अध्र्या टक्क्याची दरकपात बँकांना त्याची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहनपूरक ठरतील, यात शंका नाही. यामुळे गृह कर्जदारांचे व्याजदरही कमी होईल.
– ब्रोतिन बॅनर्जी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, टाटा हाउसिंग

विकासाभिमुख अर्थसंकल्पानंतर रिझव्‍‌र्ह बँकेच्या अनपेक्षित व्याजदर कपातीने मोठय़ा प्रमाणात सकारात्मक निर्देशन केले आहे. महागाईकडे दुर्लक्ष न करता विकासाला चालना देण्याचा सरकारबरोबरचा रिझव्‍‌र्ह बँकेचा प्रयत्न स्तुत्य आहे. मागणी आणि गुंतवणूक वाढण्यासाठी व्याजदर कपातीची मागणी उद्योग महासंघाने सातत्याने लावून धरली होती. अशा धाडसी निर्णयासाठी निश्चितच रिझव्‍‌र्ह बँक कौतुकास पात्र आहे.
– चंद्रजीत बॅनर्जी, महासंचालक, भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय)

व्याजदरातील कपात ही फार आश्चर्यजनक आहे असे नाही. केंद्रीय अर्थसंकल्प पाहता तसे प्रत्यक्षात घडणारच होते. ग्राहकांच्या दृष्टीने हा खूपच परिणामकारक निर्णय ठरेल. अन्य बँकांमार्फतही लवकरच व्याजदर कपात लागू केली जाईल. माझ्या अंदाजाने दहापैकी ६ बँका तरी येत्या दोन महिन्यांत व्याजदर कमी करतील.
– व्ही. वैद्यनाथन, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कॅपिटल फर्स्ट

अर्थसंकल्पातील साचेबद्ध सुधारणा या विकास आणि वित्तीय धोरणाला पूरक असल्याचे दिसून आले. त्याच्याच जवळ जाण्याचा प्रयत्न रिझव्‍‌र्ह बँकेने यंदा केला आहे. वर्षांत दुसऱ्यांदा व्याजदर कपात करून भांडवली खर्च कमी करणे, अर्थव्यवस्था सुधाराला प्रोत्साहन देणे, तसेच कंपन्यांच्या मिळकतीला जोड देण्याचा उपक्रम केला गेला आहे. इक्विटी व डेट अशा दोन्ही बाजारपेठांसाठी हा सकारात्मक निर्णय आहे.
– निराकर प्रधान, मुख्य गुंतवणूक अधिकारी, फ्युचर जनराली लाइफ इन्शुरन्स

रिझव्‍‌र्ह बँकेने पुन्हा एकदा पाव टक्का व्याजदर कपात करून धक्का दिला आहे. याचा तात्काळ परिणाम म्हणजे सरकारी रोख्यांचे व्याज (यील्ड) ०.८ ते ०.१३ टक्के कमी होताना दिसत आहेत. विद्यमान वातावरण कायम राहिल्यास येत्या काही महिन्यांमध्ये आणखी पाव टक्का कपात होऊ शकेल. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा स्थिरावतील.
– बेक्झी कुरिआकोस, प्रमुख (फिक्स्ड इन्कम), प्रिन्सिपल पीएनबी अ‍ॅसेट मॅनेजमेन्ट कंपनी

रिझव्‍‌र्ह बँकेची नवी व्याजदर कपात ही लगेचच अमलात येणार आहे. यामुळे नव्या तसेच जुन्या गृह कर्जदारांचे व्याजदर पाव टक्क्यांनी कमी होतील. ते वार्षिक किमान ९.७५ टक्के असतील.
– ऋषी मेहरा, सह संस्थापक, डिल्सलोन्स.कॉम.

वित्तीय धोरणाबाबत केंद्र सरकारने सुतोवाच केले होते. त्याचीच पाठराखण रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या यंदाच्या पतधोरणाने झाली आहे. मध्यम कालावधीसाठी महागाई स्थिरावली आहे आणि आता विकासाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, हेच यातून स्पष्ट होते.
– गगन बंगा, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स

व्याजदर कपातीचा लाभ एकूणच स्थावर मालमत्ता क्षेत्राला होणार आहे. कर्ज नजीकच्या कालावधीत स्वस्त होण्यासह अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात चलित भांडवलही उपलब्ध होईल. कर्ज खर्चातही अध्र्या टक्क्यापर्यंतची कपात होईल.
– हरिप्रकाश पांडेय, उपाध्यक्ष (वित्त व गुंतवणूक संबंध), एचडीआयएल.

व्याजदर कपातीने बुधवारच्या दिवसाची एक चांगली सुरुवात झाली, असे म्हणता येईल. उत्कृष्ट केंद्रीय अर्थसंकल्पानंतर रिझव्‍‌र्ह बँकेचे व्याजदर कपातीचे धोरण हे सरकार आणि बँक नियामक यांचा प्रवास देशाला विकासाकडे नेणारा आहे, हेच सूचित करते. कर्जदारांना दिलासा देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्याची अंमलबजावणी आता बँकाही निश्चितच करतील.
– जॉर्ज अलेक्झांडर, व्यवस्थापकीय संचालक, मुत्थूत फायनान्स

जानेवारीनंतर दोन महिन्यांच्या आत रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का व्याजदर कपात केली आहे. पतधोरणाव्यतिरिक्त करण्यात आलेली दरकपात निश्तिच आश्चर्यकारक आहे. वित्तीय धोरण आणि ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकांची प्रतीक्षा करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेने तिच्या फेब्रुवारीमधील भूमिकेची अंमलबजावणी केली आहे. ७ एप्रिलच्या पतधोरणात पाव टक्का व्याजदर कपात होईल, हा अंदाज आता नाहीसा झाला असून यंदा स्थिर पतधोरण असेल.
– दीपेन शाह, प्रमुख संशोधक, कोटक सिक्युरिटीज.

सरकारच्या एकूण वित्तीय धोरणाला यामार्फत एक प्रकारचे समर्थनच रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहे. अर्थव्यवस्थेतील कमी पतपुरवठय़ाचा मार्ग यामुळे निकाली निघेल. कपातीचे हे पतधोरण यापुढेही कायम राहील. वर्षभरात किमान एक टक्का दरकपात होईल.
– लक्ष्मी अय्यर, मुख्य गुंतवणूक अधिकारी (डेट) आणि उत्पादन प्रमुख, कोटक म्युच्युअल फंड