वार्षिक (संवत्सर) तुलनेत सोने-चांदीचे दर मोठय़ा प्रमाणात कमी झाले असून, परिणामी यंदाच्या परंपरागत खरेदीचा मुहूर्त अर्थात धनत्रयोदशीला मौल्यवान धातूची विक्री अधिक झाल्याचा दावा केला जात आहे.

संवत्सर वर्षांत सोन्याचे दर १७ टक्क्यांनी, तर चांदीचे मूल्य २१ टक्क्यांनी घसरले आहेत. तर यंदाच्या सोने खरेदीच्या मुहूर्ताला विक्री ३० टक्क्यांपर्यंत होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. यंदाच्या सणानिमित्ताने दागिन्यांसाठीच्या नोंदणीचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी वाढल्याचे कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरमण यांनी सांगितले. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत यंदा सोने दागिने मागणी २५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असे मनुभाई ज्वेलर्सचे संचालक समीर सागर यांनी म्हटले आहे. कंपनीने यंदा ई-कॉमर्सवर दिलेला भर सकारात्मक परिणाम नोंदवीत असल्याचे वामन हरी पेठेचे संचालक आदित्य पेठे यांनी सांगितले.

सुधारत असलेली रोकड तरलता व ग्रामीण भागातील वाढती क्रयशक्ती यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेबरोबरच दागिन्यांच्या बाजारपेठेतही गेल्या काही दिवसांपासूनच वाढ अधिक होती. ऑक्टोबर २०१५ पासून दुष्काळी परिस्थिती व मंदावलेली आर्थिक परिस्थितीचा परिणाम सराफा बाजारावर सप्टेंबर २०१६ पर्यंत जाणवत होता. मात्र संपूर्ण देशभरात झालेल्या यंदाच्या चांगल्या मान्सूनमुळे व सुधारणाऱ्या औद्योगिक उत्पादन, कमी होत असलेली महागाई आदींमुळे ग्राहकांचा गुंतवणूक व खर्च करण्यावर भर दिसत आहे. याचाही परिणाम गेल्या वर्षभरापासून मंदावलेली आर्थिक स्थिती सुधारण्यावर झाल्याचे मानले जात आहे.

दोन लाख व त्यापेक्षा अधिक मूल्याच्या सोने खरेदीला पॅन कार्डचे सरकारी बंधन हे काही प्रमाणात ग्राहकांची इच्छा व मर्यादेला संकुचित करत असल्याचे यापूर्वी दिसले. आयात शुल्क दोन टक्क्यांनी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयानेही मौल्यवान धातूच्या १० ग्रॅममागील मूल्यावर ५०० ते ७०० रुपयांचा फरक पडला आहे. मौल्यवान धातूची वाढती आयात रोखून सरकारच्या तिजोरीवरील भार कमी करण्याच्या हेतूचा परिणाम देशाच्या सोने मागणीवर झाला आहे. जानेवारी ते जून २०१६ दरम्यान सोने मागणी वार्षिक तुलनेत ३० टक्क्यांनी कमी होत २४७.४० टन झाली आहे.

untitled-12