सुधारीत शर्तीनुसार, केर्न इंडियाच्या भागधारकांना एक नव्हे तीन समभाग मिळणार
अनिल अगरवालप्रणित वेदांत समूहातील केर्न इंडिया – वेदांता लिमिटेड विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यास नऊ महिन्यांचा कालावधी असतानाच केर्न इंडियाच्या अल्पसंख्याक भागधारकांना एकऐवजी तीन समभाग देण्याची खूशखबर प्रवर्तकांनी दिली आहे. उभय कंपनीच्या शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सुधारीत समभाग रचनेला मान्यता देण्यात आली.
केर्न इंडियाचे २.३ अब्ज डॉलरच्या वेदांता समूहातील विलीनीकरण प्रतीक्षेत आहे. ही प्रक्रिया मार्च २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कंपनीने यापूर्वी या विलीनीकरणामुळे केर्न इंडियाच्या भागधारकांना एक समभाग देण्याचे निश्चित केले होते. मात्र समूहाचे अध्यक्ष अनिल अगरवाल यांनी शुक्रवारी याबाबत अधिक स्पष्ट करत भागधारकांना तीन समभाग देण्याचे घोषित केले.
यानुसार केर्न इंडियाच्या अल्पसंख्याक भागधारकांना वेदांतच्या १० रुपये दर्शनी मूल्याचे तीन समभाग प्राप्त होतील. यापूर्वीच्या प्रस्तावाला कंपनीतील भारतीय आयुर्विमा महामंडळासारख्या (एलआयसी) अल्पसंख्याक भागधारकाने विरोध दर्शविला होता. त्यामुळे विलीनीकरणही रखडले. यापूर्वीची १:१ समभाग उपलब्धतता १४ जून २०१५ मध्ये जाहीर करण्यात आली होती. एलआयसीचा केर्न इंडियात सर्वाधिक ९.०६ टक्के, तर वेदांतामध्ये ३.९ टक्के हिस्सा आहे, तर ब्रिटनच्या केर्न एनर्जीचाही केर्न इंडियात काही वाटा आहे.
केर्न इंडियाचे वेदांता लिमिटेडमधील विलीनीकरण यापूर्वी जून २०१६ पर्यंत अपेक्षित होते. मात्र समभाग संख्येच्या वादात ते राहिले. नव्या रचनेनंतर आता ते मार्च २०१७ पर्यंत पूर्ण होईल, असे बैठकीनंतर केर्न इंडियाचे अध्यक्ष नवीन अगरवाल यांनी सांगितले.
दरम्यान, नव्या समभाग रचनेनंतर केर्न इंडियाचे भांडवल २,८८७ कोटी रुपयांनी उंचावले. कंपनीच्या समभागाला मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर ९ टक्के अधिक भाव मिळाला.