सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेचे ४ कोटी समभाग भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून विमा कंपनीची या बँकेत १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
महामंडळाचा तूर्त बँकेत ६.४ टक्के हिस्सा आहे. बँकेचे २.९५ कोटी समभाग डिसेंबर २०१४ अखेर महामंडळाकडे होते. महामंडळ आता प्राधान्य तत्त्वावर बँकेचे समभाग खरेदी करणार आहे.
हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी समभागाची मूल्य निश्चिती आदी ३१ मार्चअखेरच झाली आहे. प्रत्यक्षातील किंमत लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्याचबरोबर खरेदी प्रक्रियेची तारीखही जारी केली जाईल.
समभाग विक्रीसाठी बँकेने यापूर्वीच परवानगी दिली आहे, तर महामंडळानेही त्याला लगेच होकार दर्शविला आहे. याबाबत महामंडळाला ३० एप्रिलपर्यंत भागधारकांची परवानगी मिळवावी लागेल.
बँकेतील महामंडळाची एकूण गुंतवणूक १५ टक्क्य़ांच्या वर जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
बिकट स्थितीतील सार्वजनिक उपक्रमांना हात देण्याचा महामंडळाचा क्रम पुन्हा मांडला जाणार आहे. कॅनरा बँकेने डिसेंबर २०१४ अखेर निव्वळ नफ्यात तब्बल ६० टक्के वाढ नोंदविली असली, तरी ढोबळ अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण मात्र ३.३५ टक्क्य़ांवर गेले आहे. तर बँकेचे निव्वळ अनुत्पादक प्रमाण २.३९ टक्क्य़ांवरून २.४२ टक्क्य़ांपर्यंत पोहोचले आहे.e02

जीवन विमा योजनेच्या ‘नॉमिनी’ बदलासाठी आता १०० रुपये
तुम्ही घेतलेल्या जीवन विमा योजनांसाठी नामनिर्देशित व्यक्तींचे नाव टाकायचे वा बदलायचे झाल्यास तुम्हाला आता १०० रुपये मोजावे लागतील. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल केला असून यानुसार १ एप्रिल २०१५ पासून नामनिर्देशित व्यक्तीच्या नावातील बदलासाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाईल. विमा कायद्यानुसार विमाधारक आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव नामनिर्देशित करू शकतो. धारकाच्या मृत्यूपश्चात दाव्यातील रक्कम योजेनेत संबंधित नाव असलेल्या व्यक्तीला मिळण्यासाठीची ही सोय आहे. मात्र त्यात बदल करण्यासाठी आता १०० रुपये आकारले जाणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन विमा घेताना ५० रुपयांपेक्षा अधिक रक्कम कंपन्यांना घेता येणार नाही, असाही बदल नियामाकाने केला आहे.