सरकारने रद्द केलेल्या जेएसपीएलच्या (जिंदाल स्टील अ‍ॅन्ड पॉवर लिमिटेड) तीन खाणी सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाला बहाल करण्यात आल्या आहेत. कोळसा खाणींच्या यंदाच्या लिलाव पर्वात सर्वाधिक बोली यामार्फतजिंदाल समूहामार्फत लावली गेली व ती जिंकण्यातही आली होती.
जेएसपीएलसह बाल्कोनेजिंकलेल्या तीन खाणी रद्द करत त्या आता कोल इंडियाला दिल्या आहेत. ३१३.६८ मेट्रिक टन क्षमतेच्या या खाणी आहेत. जेएसपीएलच्या छत्तीसगडमधील गारे पालमा चार/१,चार/२, चार/३ व तारा खाणी व बाल्कोची गारे पालमा चार/१ ही खाण कोल इंडियाकडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दोन टप्प्यात झालेल्या कोळसा खाणी लिलाव प्रक्रियेत आतापर्यंत ३३ खाणींचा लिलाव झाला आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १९ खाणींचा लिलाव झाला. तर १४ खाणी दुसऱ्या टप्प्यात विकण्यात आल्या. कोळसा खाणीतील लिलाव प्रक्रिया आणखी आठवडाभर सुरू राहणार आहे. ३३ खाणी लिलावातून सरकारने २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा अंदाज आहे.
नुकत्याच झालेल्या प्रक्रियेतील नऊ खाणींच्या लिलावाची सरकार पुन्हा पडताळणी करत असल्याचे समजते. या खाणींना अतिशय कमी दर लावून त्यातील व्यवहार संशयास्पद नोंदले गेल्याचे सरकारला वाटत आहे. तीन खाणींसाठी जिंदाल समूहाने प्रत्येकी १०८ रुपये ते १,५८५ रुपये टन किंमत मोजली आहे.
िजदालसह अदानी, जीएमआर, रिलायन्स, वेदांता समूहानेही यंदाच्या कोळसा खाणी लिलाव प्रक्रियेत भाग नोंदविला आहे.
धाव दिल्ली उच्च न्यायालयात
लिलाव प्रक्रियेत ताब्यात आलेल्या खोळसा खाणी सरकारद्वारे रद्द करण्यात आल्यानंतर याविरुद्ध जेएसपीएलने आता नवी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारने २० मार्च रोजी हा निर्णय घेतला होता. तर त्या खाणी आता कोल इंडियाला बहाल करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. सरकारच्या याबाबत होत असलेल्या गतिशील हालचालींमुळे हे प्रकरण आता उच्च न्यायालयाचे न्या. बी.डी. अहमद, संजीव सचदेवा यांच्या खंडपीठापुढे तातडीचे म्हणून आले आहे.
‘जेएसपीएल’ने ९५१.५० कोटींनी बाजारमूल्य गमावले
जिंदाल समूहातील जिंदाल स्टील अ‍ॅन्ड पॉवर लिमिटेड (जेएसपीएल) ला बहाल केलेल्या तीन खाणी रद्द करण्याचा निर्णय सरकारने शनिवारी घेतल्यानंतर त्याचे पडसात सोमवारी अपेक्षेप्रमाणे भांडवली बाजारात कंपनीच्या समभाग मूल्यावर उमटले. सत्रात १५ टक्क्य़ांपर्यंत उतरंड अनुभवणारा हा समभाग व्यवहारअखेर शुक्रवारच्या तुलनेत ६.३० टक्के घसरण नोंदवित १५४.५५ रुपयांवर येऊन ठेपला. यामुळे कंपनीने एकाच व्यवहारात ९५१.५० कोटी रुपयांचे बाजार भांडवल गमावले.