गेल्या सलग दोन सत्रांतील घसरण रोखून धरताना गुंतवणूकदारांनी मंगळवारी भांडवली बाजारात नफेखोरीचे व्यवहार केले. सेन्सेक्ससह निफ्टी अध्र्या टक्क्यापर्यंत घसरला.

ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्याच्या धास्तीने जगभरातील प्रमुख निर्देशांकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण असतानाच येथेही त्याचे सावट उमटले.

२०५.७२ अंश घसरणीसह सेन्सेक्स ३०,३६५.२५ वर तर ५२.१० अंश घसरणीने निफ्टी ९,३८६.१५ पर्यंत स्थिरावला. निफ्टीचा मंगळवारचा प्रवास ९,४४८.०५ ते ९,३७० दरम्यान राहिला.

गेल्या दोन व्यवहारांत निर्देशांकवाढ नोंदविल्यानंतर सेन्सेक्सची मंगळवारची सुरुवात ३०,५५३.८९ या किमान स्तरावर सुरू झाली. व्यवहारात ३०,६१०.८४ पर्यंत झेपावल्यानंतर मुंबई निर्देशांकाचा किमान स्तर ३०,३१६.९२ राहिला.

मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये औषधनिर्माण क्षेत्र सर्वाधिक, तीन टक्क्यांपर्यंत घसरले. यातील ऑरबिंदो फार्मा, ऑर्किड फार्मा, सिप्ला, मॉर्फिन लॅब, सन फार्मा, बायोकॉन, कॅडिला हेल्थकेअर, टोरंट फार्मा, डिविज लॅब, ग्लेनमार्क फार्मा, डॉ. रेड्डीज् लॅब, ल्युपिन यांचे मूल्य ६ टक्क्यांपर्यंत आपटले. त्यातील अनेकांनी तर गेल्या वर्षभराचा तळही नोंदविला.

त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, तेल व वायू, ऊर्जा क्षेत्रातील समभागांचेही मूल्य घसरले. वाहन क्षेत्रातील समभागांचे मूल्य मात्र उंचावले होते. भांडवली बाजारात येत्या गुरुवारी महिन्यातील अखेरचे वायदापूर्तीचे व्यवहार होणार आहेत.

डॉलरमागे रुपयाचीही ३४ पैशांनी आपटी!

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या छायेत मंगळवारी परकी चलन विनिमय मंचावर रुपयाने गटांगळी खाल्ली. एकाच व्यवहारात डॉलरच्या तुलनेत तब्बल ३४ पैशांनी रोडावताना स्थानिक चलन मंगळवारअखेर ६४.८९ च्या तळात विसावले.

रुपयाने ३ एप्रिल २०१७ रोजी मागे सोडलेला, अलिकडच्या सात आठवडय़ांमधील किमान स्तर आहे. महिनाअखेर असताना वाढलेल्या डॉलरच्या मागणीचा विपरीत परिणाम रुपयावर दिसला. भांडवली बाजारातील विदेशी गुंतवणूक काढून घेण्याच्या सपाटय़ामुळेही अमेरिकी चलनाची मागणी रुपयाच्या विनिमय  मूल्याला खोलात घेऊन गेली.

६४.६४ अशी किमान स्तरावर सुरुवात क रणारा रुपया व्यवहारात ६४.९० पर्यंत घसरला. दिवसअखेर त्यात सोमवारच्या तुलनेत ०.५३ टक्के घसरण झाली. यापूर्वीच्या सलग दोन व्यवहारांत रुपया २९ पैशांनी भक्कम झाला आहे.

मिड-स्मॉल कॅपवर घसरणीचा वार

शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकापेक्षा छोटय़ा गुंतवणूकदारांची अधिक पसंती असलेल्या मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांवर मंगळवारी विक्रीचा तीव्र दबाव दिसून आला. गेल्या गुरुवारप्रमाणे सेन्सेक्समधील घसरण ही अध्र्या टक्क्याची असताना हे दोन्ही निर्देशांक मात्र दोन टक्क्यांपर्यंत आपटले. या निर्देशांकातील अनेक समभागांचे मूल्य सोमवारच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांनी घसरले. चिंताग्रस्त वातावरण म्हणा किंवा नफेखोरी, या गटातील समभागांवर मंगळवारी विक्रीचे सपाटून वार झाले.

अदानी पोर्टची ६ टक्क्य़ांनी घसरगुंडी

सेन्सेक्समध्ये अदानी पोर्ट्सचा समभाग सर्वाधिक, ६.१९ टक्क्यांसह आपटला. तर मुंबई निर्देशांकातील घसरणीच्या यादीत २२ कंपन्यांचा समावेश राहिला. तेजीतील वाहन कंपन्यांच्या समभागांसह विप्रो, टाटा स्टीलचेही मूल्यही वाढले. तर घसरलेल्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा, भांडवली वस्तू आदी निर्देशांक राहिले. आशियाई बाजारात जपान, शांघाय येथील निर्देशांकांमध्ये अध्र्या टक्क्यापर्यंतची घसरण झाली. युरोपीय बाजारही किरकोळ घसरणीनेच खुले झाले.

सोने २९ हजारांकडे; चांदीही किलोमागे ४० हजारांपल्याड

मौल्यवान धातू दरांमध्ये मंगळवारी लक्षणीय दरझेप नोंदली गेली. सोने तोळ्यासाठी २२० रुपयांनी अधिक वाढून २९ हजारांनजीक पोहोचले. स्टॅण्डर्ड सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा दर मंगळवारअखेर २८,८६५ रुपयांवर स्थिरावला. तर चांदीच्या किलोच्या दरात सोमवारच्या तुलनेत एकदम ५१५ रुपयांची भर पडून पांढरा धातू ४०,१५५ रुपयांवर पोहोचला.