दिवाळी सणोत्सवाला नव्या उत्पादनांची जोड यांनी नोव्हेंबरमधील देशातील वाहन विक्रीला तारले आहे. मारुती, ह्य़ुंदाई या पारंपरिक वाहन उत्पादक कंपन्यांसह फोर्ड, रेनो या नव्या पिढीतील कंपन्यांच्या विक्रीतही यंदा वाढ नोंदली गेली आहे.
नोव्हेंबरमधील देशातील प्रवासी वाहन विक्रीची कंपनीनिहाय आकडेवारी मंगळवारी जाहीर झाली. यामध्ये देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीने ९.७ टक्के प्रवासी वाहन विक्रीतील वृद्धी राखली आहे. कंपनीच्या १,२०,८२४ वाहनांची विक्री गेल्या महिन्यात झाली, तर देशांतर्गत वाहन विक्री १०.६ टक्क्यांनी वाढली.
कंपनीने दोनच महिन्यांपूर्वी सादर केलेल्या बलेनोसह एकूण कॉम्पॅक्ट श्रेणीतील वाहन गटाची वाढ १९.५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
मूळच्या कोरियन कंपनी ह्य़ुंदाईने ६.२ टक्के विक्रीतील वाढ नोंदविताना नोव्हेंबरमध्ये ५७,६६१ वाहनांची विक्री केली आहे. कंपनीची देशांतर्गत वाहन विक्री २३ टक्क्यांनी वाढली आहे; तर निर्यात मात्र २५.४ टक्क्यांनी रोडावली आहे. ह्य़ुंदाईने गेल्याच महिन्यात एकूण ४० लाख देशांतर्गत वाहन विक्रीचा पल्ला गाठला होता.
फोर्ड इंडियाच्या वाहन विक्रीत यंदा ३४.७८, तर रेनोच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आहे. दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे १७,१८९ व ७,८१९ वाहन विक्री राखली आहे. महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्रने २१ टक्के प्रवासी वाहन विक्रीतील वाढ नोव्हेंबरमध्ये राखली.
टोयोटा किलरेस्कर व होन्डा कार्स यांना मात्र यंदा घसरणीला सामोरे जावे लागले आहे. होन्डाच्या विक्रीत ३.६१ टक्क्यांची, तर टोयोटाच्या विक्रीत १९ टक्क्यांची घट झाली आहे. वाणिज्य वाहननिर्मित्या अशोक लेलॅण्ड व व्हीई कमर्शिअल व्हेकल कंपनीने घसघशीत विक्रीतील वाढ नोंदविली आहे. दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे १६ व २६ टक्के वाढ राखली आहे.